14 June ,2020 ला सुशांत सिंग राजपूत , एक गुणी आणि talented Human being त्याला आपलेश्या वाटणाऱ्या अंतरिक्षात , चमचमणाऱ्या ताऱ्यां मध्ये विरघळून गेला. पृथ्वीवर आपण सगळे अजूनंही हळहळतोय.....आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतंय .... त्याने जर का मला phone केला असता तर त्याला मी समजावले असते. पण त्या ताऱ्याची दुःख त्यालाच माहित होती.... त्याची लढाई तो एकटाच लढत होता आणि कदाचित स्वतःशीच लढत होता. अखेर त्याला जिथे जाण्याची ओढ होती तिथे तो सुखरूप पोचला. त्याच्या मिचक्या डोळ्यांमधले तारे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री अतिशय जोमात चमकताना दिसतील. त्याच्या निरागस आणि खळखळणाऱ्या हास्यामुळे त्याच्या आजूबाजूचे तारे अजूनचं चमकतील. आपली भूमिका फक्त "बघ्यांची".
त्या रविवार नंतर जेव्हा जेव्हा मी ह्या आपल्यातून निखळून पडलेल्या ताऱ्याविषयी विचार करते आहे तेव्हा मला अगदी थोड्या वेळा साठी भेटलेल्या अश्याच एका बुजऱ्या ताऱ्याची प्रकर्षाने आठवण होत आहे. हे दोन्ही तारे भेटले असतील का एकमेकांना ? आता तरी ते मन मोकळे पणी बोलू शकत असतील का एकमेकांशी?
मी आमच्या घरातील पहिली मुलगी , मोठी मुलगी. माझ्या आबांचें मी पहिल वाहिलं नातवंडं. माझ्या काकांची मी पहिली वहिली पुतणी .... आणि माझे स्वतःचे त्या वेळी तरी काहीही कर्तृत्व नसताना घरात सर्वात अढळ स्थान होते...सर्वांची अतिशय लाडकी. ह्या status चे फायदे तसेच तोटे .....
मला कुठल्या शाळेत घालायचे ह्या बद्दल एक "मेज" परिषद भरली. अश्या परिषदा फोल ठरल्याने आणि एकमत होतं नसल्याने मी "अ , आ ,इ ,ई ..." न शिकता " A, B, C, D......." शिकले. परत "मेज" परिषदेचा निर्णय बदल्यामुळे मी "पार्ले टिळक विद्यालय" मध्ये मराठीत शिकू लागले.
माझ्या "A ,B,C,D" च्या ज्ञान्याच्या जोरावर मी मराठी शिकू लागले. त्यामुळे मला मराठी समजून घेणे आणि लिहिणे दोन्ही कठीण जात होते. मग काय शाळेत माझ्या कडे वेळच वेळ .......
तो वेळ घालवण्या साठी माझी आजूबाजूच्या मुलींसोबत बडबड सुरु झाली. माझी बडबड, खिदळणे आणि शिक्षा ह्यांचे direct correlation होते. तरीही माझ्या आईच्या चिकाटीने आणि बाईंच्या मदतीने मी पहिली इयत्ता पार केली.
दुसऱ्या इयत्तेत वर्ग दुसरा, बाई वेगळ्या मात्र आजूबाजूला मुलं मुली आधीच्याच. मला पूरक वातावरण मिळाले आणि माझी बडबड परत जोरात चालू झाली. आणि अर्थातच बडबड आणि शिक्षा यांचे correlation same राहिले.
नवीन बाई मात्र जरा वेगळ्या आणि innovative होत्या शिक्षांच्या बाबतीत .....
बाकाच्या बाजूला उभे राहणे, १ ते १० पाढे ५ वेळा लिहिणे इत्यादी इत्यादी शिक्षांशी माझी गट्टी जमली होती. आणि अश्याच एका माझ्या normal बडबडीच्या दिवशी मला एक आगळी वेगळी शिक्षा मिळाली.
"स्वाती , जरा उठ आणि पहिल्या बाकावर येऊन बस. आणि पुढील एक आठवडा म्हणजे सात दिवस तू इथेच बसायचं. "
बाईंच्या धारदार आवाजा सरशी मी माझे बस्तान आवरतं घेतं पहिल्या बाकावर बसण्याचा प्रवास सुरु केला. प्रवास फक्त ४ बाकां चा होता पण त्यातही "सीते "प्रमाणे पेन्सिल, पट्टी खाली पडत पाडत मी पहिल्या बाका पर्यंत पोचले. वर्गातल्या सगळ्यांची फुकटची करमणूक झाली होती. शिक्षा मिळाली असूनही बाकीच्या बरोबर मी सुद्धा खुदु खुदु पण अस्पष्ट पणे हसत होते.
"चौथा बाक सोडून पहिल्या बाका वर बसणे ही काय शिक्षा आहे का? बाईंच्या पाठी मागे मी अजूनही हळूच बोलू शकेन. एक आठवडा काय पूर्ण वर्ष बसेन. त्यात काय मोठं ?!" असा मनातल्या मनात मी विचार करत होते.
शेवटी चार बाकां चा तो "सोप्पा " प्रवास पूर्ण झाला. बाई शिकवू लागल्या. माझ्या बाजूला माझ्या सारखीच मुलगी बसली होती. मी तिच्या कडे दोन तीन वेळा पहिले पण तिने माझ्याकडे लक्षच दिले नाही. खांद्याला खांदा लागेल आणि पेन्सिल, पट्ट्या एकामेकांच्या हद्दीत सहज जातील एवढासा तो बाक ! तरीही तिचे डोकं मात्र खाली.
"अरे! कमाल आहे ह्या मुलीची ! नवीन मुलीशी ओळख करून घ्यायला नको का? बाईंनीच सांगितलं होत की ...सगळ्यांशी हसत खेळात वागा, नवीन मुलांशी ओळख वाढावा. त्यांना बोलतं करा, त्यांच्या बरोबर खेळा. ही बहुदा स्वतःला शहाणी समजतें. असो, तू राणी तुझ्या राज्यात .!!!!... मी सुद्धा बोलणार नाही हीच्याशी. मला माझ्या मैत्रिणी आहेत. दुसऱ्या बाकांवर बसलेल्या असतील तरीही सुट्टीत आम्ही एकत्र खेळू. हिला घेणारच नाही मीं पकडा पकडीत." मनातल्या मनात स्वगतं चालू होते.
पण लगेच विचार आला, " ही खरंच शहाणी मुलगी आहे. बाईंचं ऐकते. माझ्या सारखी नाही. कदाचित सुट्टीत बोलेल किंवा मला शिक्षा झाल्या मुळे बोलत नसेल."
अस इथे तिथे करत असतानाच मधली सुट्टी झाली. मी ताबडतोब माझा पोळी भाजीचा डबा घेऊन मागच्या बाकांवरच्या मैत्रिणीं कडे धावले. माझ्या नवीन आणि जबरदस्तीने झालेल्या शेजारणीला पटकन विचारले पण तिने माझ्या कडे मान वर करून पाहिले नाही , माझ्या प्रश्नाचे उत्तरही दिले नाही. मला जरा राग आला ," खूपच आगाऊ आणि आखडू आहे ही . जाऊ दे मी कशाला माझा वेळ फुकट घालवू हिच्या साठी? तिची मर्जी!!!!"
मी माझ्या मैत्रीण बरोबर बोलण्यात आणि खेळण्यात हरवून गेले. सुट्टी संपली आणि परत मी माझी नवीन जागा ग्रहण केली.
परत मला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. खांद्याला खांदे भिडले. मी लगेचच आमच्या दोघीं मध्ये पट्टी ठेवून "माझी sovereignity declare केली." तिच्यावर त्या पट्टीचा आणि माझ्या declaration चा काहीही फरक पडला नव्हता.
त्या दिवसा अखेरीस मला तिचा प्रचंड राग आला होता ,पण तिच्या बद्दल ची उत्सुकता ही वाढली होती. जे माझ्यात नव्हत ते तिच्यात होतं.
बोल आणि अबोल एकत्र येत होते.
बाईंची innovative शिक्षा अगदी पहिल्या दिवसापासूनच efficiently काम करू लागली होती. त्या दिवशी सलग ४/५ तास मी वर्ग चालू असताना बोलले नव्हते. मात्र माझे माझ्याशी स्वगतं चालू झाले होते. ती "अबोली" माझ्याच वर्गात आहे हे तो पर्यंत मला माहीतच नव्हते. माझ्याच सारख्यांशी बोलणे किती सोप्पं होत, पण "अबोली"शी एकही शब्द न बोलता मी बरच काही बोलत होते.
तिचा विचार मनाशी घट्ट धरून बोलत हसत मी माझ्या आईबरोबर घरी परतले. नकळत मी तिच्या बद्दलच बोलत होते. आधीचा राग हरवला होता, मात्र उत्सुकता अजूनच जागृत झाली होती. माझ्या कडे "बोल"होते; तिच्या कडे "अबोल"होते.
अस कसं होऊ शकतं ?
दुसऱ्या दिवशी थेट माझी गाडी नवीन platform पाशी थांबली. "अबोली" माझ्या आधीच जागेवर वर बसली होती. पहिल्यांदा पट्टी ठेवून माझ्या राज्याची मी आजही घोषणा केली. तिला काहीच फरक पडला नव्हता. मी तिला चिडवण्या साठी मुद्दामच जोरात बोलले," हा भाग माझा आहे. तुझ्या पेन्सिलीचे टोकही माझ्या भागात येता काम नये." तिची मान जराही वर झाली नाही की माझ्या कडे वळूनही पहिले नाही. बाई वर्गात येई पर्यंत गोंधळ चालू होता. जवळ जवळ सगळी मुलं आपल्या जागेवरून दुसरी कडे जाऊन किंवा जागच्या जागीच पाठी वळून बडबड करण्यात गुंग होती. आम्हा ५० मुलां मध्ये "ती" एकटी होती. ना तिच्या शी कोणी बोलत होते ना ती कोणाशी बोलत होती. ती "अबोली" होती.
त्या दिवशीही मी तिला बोलता करण्याचे माझे प्रयत्न चालू ठेवले. पण परिणाम कालच्या सारखाच.....
दिवस तीन :
मी गेले दोन दिवस बाई शिकवत असताना एक शब्दही बोलले नव्हते किंवा बोलू शकले नव्हते. समोर बाई आणि बाजूला अबोली!!!!
माझ्या आधी ती आलीच होती. आज मात्र बाकावर तिची पट्टी होती. पण तिची मान मात्र त्याच स्थितीत होती. मी शांत होते. स्वगतही नव्हते आणि बोल ही नव्हते. वर्ग तसाच बोलका होता. मी मात्र तिला निरखून पाहू लागले. गेल्या दोन दिवसात ,कदाचित शाळा सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच मला तिचे अस्तित्व जाणवलं होते. बाकी मुलांसाठी कदाचित ती "अदृश्य " होती.
कारण ती "अबोली" होती. आमच्या आणि तिच्या मध्ये "बोल" आणि "अबोल"लाचा पल्ला होता.
त्या दिवशी मात्र मी तिच्या भागावरही लक्ष देऊ लागले. "A good Sovereign should establish friendly relationship with the neighbouring states too. "
तिला बाईंनी दिलेली गणितं जमत नव्हती. मी तिला थोडीशी मदत केली. तिची मान तशीच होती पण मधली पट्टी मात्र थोडीशी नकळत सरकली होती. तिचे drawing खूप छान होते. माझी मान जेव्हा तिच्या चित्रात डोकावली ;तेव्हा तिचे चित्र माझ्या भागात हळूच सरकवले गेले. पट्टी परत एकदा थोडीशी सरकली होती.
आज मधल्या सुट्टीत डबा मी जागेवरच उघडला. ती शांत बसली होती. माझ्या मैत्रिणी मला मागच्या बाकांवरून बोलावित होत्या पण मी त्यांना जोरात सांगितले," आज मी इथेच डबा खाणार आहे." प्रश्न आला,"का ग?" आणि उत्तर आले,"असच."
माझ्या बाजूला काहीतरी चुळबुळ चालू होती. आणि अखेरीस तिने तिचा डबा बाहेर काढला.
"तुला भेंडीची भाजी आवडते का? मला खूप आवडते. देऊ का तुला थोडीशी? तू काय आणले आहे ?"
माझ्या एव्हड्या "बोला" नीं ती अवघडली. मला वाटलं की ती सरकलेली पट्टी थोडीशी परत उलट्या दिशेने सरकली.
"ठीक आहे. मी माझा डबा खाते. तू तुझा खा. चालेल? " अबोली ची मान होकारार्थी हलली.
पट्टी परत थोडीशी सरकली.
तिसरा दिवस संपला. आज मात्र मी खूप खुश होते. आई च्या बाजूने चालत आजूबाजूच्या मैत्रिणीशी बोलताना मी "अबोली"ला शोधात होते. पण ती दिसली नाही.
असो!. माझ्या कडे अजून ४ दिवस होते ..तिच्या बरोबरचे ४ दिवस!
दिवस चार:
परत ती माझ्या आधी बाका वर हजर होती. माझं लक्ष्य पट्टी वर गेले. माझं राज्य शाबूत आहे ना त्याची खात्री केली.
आज माझ्या राज्यात थोडीशी भर पडली होती. शेजारी राज्य थोडंस मैत्री कडे झुकले होते . चवथा दिवस जवळ जवळ तिसऱ्या दिवसा सारखाच गेला. मात्र पट्टी अजून थोडीशी सरकली होती. आता त्यातील बदल दिसून येत होता. बाई खुश होत्या; मी खुश होत होते आणि बहुदा "अबोली" ही थोडीशी आनंदी वाटत होती. त्या दिवशी मधल्या सुट्टीत मी तिच्या बरोबर , नव्हे बाजूला बसून डबा खाल्ला. आज मात्र तिने पटकन डबा संपवला. त्या नंतर बाहेर खेळायला जाताना मी तिला बोलावले. तिची मान खाली गेली. ती काहीच बोलली नाही ;अगदी मानेनेही.
आमच्या वर्गातल्या बाकीच्या मुलींना ती माहीतच नव्हती. काही जणींना तिच्या बद्दल चित्र विचित्र गोष्टी माहित होत्या. मधली सुट्टी आम्ही "अबोली" आणि तिच्या विषयीच्या गूढं गप्पां मध्ये घालवली.
"ती बोलतच नाही. .. कोणाशीच नाही. अगदी तिच्या आईशी सुद्धा! कदाचित मुकी असावी ती?! ती नेहेमीच घाबरलेली असते. तिला कोणत्याच प्रश्नाचे उत्तर येत नाही. बाईंनी मागे एकदा तिला उभा करून प्रश्न विचारला तर ती मान खाली घालून किती तरी वेळ उभीच राहिली."
बाई समोर नसतानाही , चक्क मधल्या सुट्टीतही मी गप्प होते, शांत होते आणि माझे "बोल" माझ्या पासून दूर झाले होते. कोण बर असावी ही "अबोली"?
घरी परत जाताना मला ती दिसली. आईचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता. मात्र रस्त्या वरच्या गर्दीत ती उठून दिसत होती.... ती रस्त्याच्या .... गटारांच्या अगदी कडे कडेने चालत होती... ती तीच होती "अबोली". तिची मान तशीच खाली होती. ती तिच्या आईशीही बोलत नव्हती . तिला बघत बघत माझे घर कधी आले ते कळलेच नाही. ती अजूनही माझ्या समोर चालतच होती.
मी माझ्या घराच्या gate पाशी थांबले. ती "अबोली " माझ्या घराच्या समोरच्याच बिल्डिंग मधे राहत होती.
"अररेच्या ! हे मला आज कळतंय? ती कधी दिसलीच नाही मला. " मला आनंद झाला होता.
दिवस ५,६,७:
राहिलेले तिन्ही दिवस जवळ जवळ आधी सारखेच गेले. तिची मान अधून मधून हलली. आम्ही दोघीनी एकाच बाका वर डबे खाल्ले. मी तिला उत्तर शोधण्यात मदत केली. आणि सातव्या दिवशी दोन्ही राज्य एक झाली. पट्टी नाहीशी झाली.
पण "अबोली" अजूनही तशीच होती....."बोलां” शिवाय . पण आता ती माझी मैत्रीण झाली होती. बाकी मैत्रिणींपेक्षा थोडी जास्त चांगली मैत्रीण.
शिक्षा संपली. बाईंनी मला परत माझ्या आधीच्या जागी बसायला परवानगी दिली. मी सुट्टीत बाईंच्या खोलीत गेले. आजूबाजूला जास्त कोणी नाही असे बघून मी बाईंना गाठले. " काय ग? काय पाहिजे? आता खुश ना ? शिक्षा संपली. पोटात दुखतंय का?"
" नाही. हम्म्म्म्म ...बाईईईई , मला तुमच्याशी थोड बोलायचं होतं. बोलू का?"
बाई मला घेऊन एका शांत कोपऱ्यात गेल्या. त्यांचा आवाज शांत पण गंभीर होता. का कोण जाणे पण त्यांचे डोळे मला सांगत होते ," मला माहिती आहे तुला काय सांगायचे आहे ते.
"स्वाती.... अग बोल ना.... बराय ना तुला? बोल.... मी ऐकतेय."
त्या शब्दांनी मी भानावर आले ....कदाचित माझं भान हरवलं आणि मी ओकसाबोक्शी रडू लागले. माझे "बोल" त्या खारट पाण्यात वाहून जात होते. ६/७ वर्षयांचया स्वातीला बाईंनी जवळ ओढले आणि मिठीत घेतले. "रडू नकोस. काय झाले आहे ते सांग."
"बाई , माझी शिक्षा संपली." मी अजूनच जोरात हुंदके देऊ लागले. "मला परत शिक्षा करा ना? मला पहिल्याच बाकावर बसायचे आहे." नाकातून वाहणारे पाणी आणि डोळ्यातील पाणी एकत्रं मिसळत होते.
"आधी तू शांत हो. मी तुला का म्हणून परत शिक्षा करेन? गेल्या सात दिवसांत तू एकदाही उत्तरा खेरीज एक शब्द ही बोलली नाहीस. किती हुशार आणि गुणी विद्यार्थिनी आहेस तू? मला तू खूप आवडतेस. "
" पण बाईईईई..... मला तो पहिला बाक आवडतो.... मला ना ...मला ना..... ती "अबोली" आवडते."
बाई मनापासून हसू लागल्या. त्यांनी माझी पाठ थोपटली. का ते मला बरेच वर्ष कळले नाहीं आणि जेव्हा कळले तो पर्यंत खूप उशीर झाला होता.....
इयत्ता दुसरी मी माझ्या "अबोली" बरोबर पार पाडली . पहिल्या बाकावरचा प्रत्येक दिवस सारखाच होता..... तेच दोन डबे, खेळायला येण्याचा आग्रह, प्रश्नांची उत्तरं , तिची अधून मधून हलणारी आणि बहुतेक वेळा खाली घातलेली मान आणि माझे "बोल" आणि तिचे "अबोल" ......
आणि वर्ष्यानं मागून वर्ष धावू लागली तसे आमचे वर्ग वेगळे झाले. अभ्यास, परीक्षा , स्पर्धा ,मैत्रिणी, वाढल्या.... आम्ही सगळे मोठे होत होतो. शाळेत येण्या जाण्याचा मार्ग बदलला ....
ह्या गर्दीत आणि वेगात ती "अबोली" कुठे तरी हरवली. तिचा पकडलेला हात माझ्या हातून निसटून गेला. आणि मला ते कळल ही नाही.....मुख्य म्हणजे जाणवल ही नाही.
मी परत बोलकी झाले. आता मात्र मोठी झाल्याने शिक्षा नाहीश्या झाल्या. आणि माझी "अबोली" दिसेनाशी झाली.
मी " जबाबदार" झाले.
"जबाबदार मी, हुशार मी, अभ्यासू मी, आणि बोलकी मी" आता कॉलेज मध्ये जाऊ लागले.
माझे विश्व perfect होते...... बोलके होते.
आणि एका दुपारी मला ती "अबोली " दिसली.
ह्या वेळेस मात्र तिची मान सरळ होती. तिचा चेहेरा शांत होता. मी प्रथमच तिचा चेहेरा इतक्या जवळून स्पष्ट पणे पाहत होते.
तिच्या ओठांवर एक मलूल हास्य होते. तिचे डोळे मिटलेले होते. आणि ती अबोल "अबोली" होती.
मी थरथर कापू लागले. माझे शरीर थंड पडले. पायातले त्राण गाळून पडले आणि मी धबकन खाली बसले.
"अबोली ...माझी अबोली" निघून गेली होती.
जेव्हा १६/१७ वर्ष्यांच्या आम्हा सगळ्यांचे "बोल" आकाशला साद घालू बघत होते, उज्ज्वल भविष्याचे मनोरे रचत होते तेव्हा ही १६/१७ वर्ष्यांची "गोरी, नाजूक आणि अगदी आमच्या सारखीच दिसणारी 'अबोली" अंतराळात सामावून गेली होती.
बोलक्या माणसांकडे एकच "बोल" उरला होता......"का?"
अबोली कडे बोल नव्हते. त्याची कारणं खूप असतील पण मी कधीच शोधली नाहीत.
तिच्या बाजूला बसणें ही माझ्या दृष्टीने एक शिक्षा होती. पण तिला काय वाटत होते हे कधीच शोधले नाही.
मी माझे राज्य घोषित करून तिच्या माझ्यात पट्टी ठेवली होती. त्या विभागणीने तिला कसे वाटले असेल?
४९ मुले वर्गात पटापट उत्तर देत असताना आपले "बोल" सोडून गेल्या नंतर तिला कसे वाटले असेल?
मधल्या सुट्टीत मुलांच्या गर्दीत आणि आवाजात एकटं राहुन तिला कसे वाटले असेल?
तिच्या सोबत बसून आपापला डबा खाण्यातील आनंद माझ्या पेक्षा तिला जास्त झाला असेल का?
माझ्या कडून प्रश्नांची उत्तर समजावून घेताना तिला कसे वाटले असेल?
ती "पट्टी" नाहीशी झाल्यावरच तिचा आनंद माझ्या पेक्षा किती तरी पटीने जास्त असेल बहुदा.
आणि जेव्हा मी तिचा हात सोडला...... मी तिला आयुष्याच्या गर्दीत हरवूंन बसले..... इतके की….मला जराशी आठवण ही होऊ नये......
कुठल्या दिव्यातून गेली असेल ती?
एकटीचं रडली असेल ती एका कोपऱ्यात; आजूबाजूच्या गर्दीत बोलणे चालू असताना.
मी कुठे होते ती रडताना.... मी का हरवलं तिला?
मी तिचे "बोल" होते....... आणि ती माझी "अबोली"......
आज प्रथमच तिची मान ताठ होती , आणि माझी झुकलेली.
मी तिच्या खाली घातलेल्या डोळ्यांमध्ये पाहण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. का?
नक्कीचं आता ती तिच्या राज्यात राणी असेल. हसत असेल , बागडत असेल , आनंदी असेल.
तिला आपण हवे होतो का ?...... की आपल्याला तिची जास्त गरज होती?
एका हाताला दुसरा हात लागतोच.... तिच्या हातीं कोणाचाच हात नव्हता ....आणि म्हणूनच ती न बोलता अबोली आपल्यातून कायमची निघून गेली.
"अबोली".....ती माझ्या पेक्षा, आपल्या सर्वांपेक्षा खूप खूप वेगळी होती.
आता उरले ते फक्त प्रश्न ..... एक प्रश्न माझ्या श्वासात नेहेमीच असतो आणि कायम राहिलं "मी तिचा हात पकडला असता तर?..... तिला उत्तर शोधण्यात मदत केली असती तर?......"
अबोली मात्र खुश आहे...... तिच्या सारख्याच टिमटिमणाऱ्या ताऱ्यां मध्ये खेळ्तेय ...हसतेय.
मी दररोज रात्री "तो अबोली" तारा शोधते...... सापडला तर तिचा हात घट्ट पकडून ठेवायला..... तिची उत्तर शोधायला .....
पण डोळ्यातले पाण्या मुळे "अबोली" ताऱ्यां मध्ये हरवून जाते.