My Blog List

Thursday 6 August 2020

तू भास , तूचि आभास


                           Dancing Ganesha | Baby ganesha, Ganesha elephant, Ganesha drawing

                                                                     courtesy: Pinterest 

Fumiko sensei ने आपला शब्द लगेचच पाळला. 
मला ब्रह्म रूप दाखविलेल्या आठवड्याच्या पुढल्या मंगळवारी  Asakusa station वर सकाळी ९ वाजता भेट ठरली. 

Asakusa हे सर्व tourists चे तीर्थक्षेत्र अगदी "2 things to do in Tokyo"असे जरी google केलंत तरी "Sensoji temple in Asakusa" तुम्हाला दिसेल. 

आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना आम्ही Asakusa ला घेऊन जाणे हे एक ritual होते. 

"Fumiko sensei ला सांगून काही फायदा नाही. किती वेळा Asakusa ला जायचे?! जवळ जवळ एक तास प्रवास आहे..."
मी जराशी का कु करत  होते. पण Japanese sensei च्या वाटेला न जाणे शहाणपणाचं असतं आणि मी मंगळवारच्या भेटीची मानसिक तयारी सुरु केली. 

सकाळी लवकर आटोपून Komazawa park मधून चालत Komazawa Daigaku स्टेशनवर पोचले. Asakusa साठी नक्की कुठली line घ्यावी लागेल त्याची खात्री करण्यासाठी स्टेशन वरील एका रंगीबेरंगी अश्या मोठ्या नकाशा सामोरे उभे राहिले. 

Tokyo किंबहुना जपान ; जेवढा जमिनीच्या वर तितकाच भूमिगत..... . Roppongi हे सर्वात खोल वरचे स्टेशन चक्क ४३ मीटर्स जमिनीखाली वसलेले आहे.... स्टेशन ते exit मधील अंतर जवळ जवळ २०० पायऱ्यांचे ....  जमिनीखाली उभारलेल्या एक १२ मजली इमारती इतके अंतर.... 

                 rosenzu_j 

Asakusa ला पोचण्यासाठी लागणाऱ्या lines चे रंग आणि numbers लक्षात आल्यावर मी ट्रेन पकडली. 
ट्रेन मध्ये  चिडीचूप शांतता.........  तुम्ही आणि तुमचा फोन कायम silent वर हा नियम .......
चालत्या गाडीत  फोन वर बोलणे हे जपानी पद्धतीत अतिशय वाईट शिष्टाचार !

 मी दोन lines बदलून एका तासाने Asakusa च्या station वर उतरले. सर्व प्रथम घड्याळ पाहिले .... ठरवल्या प्रमाणे भेटीच्या वेळेच्या १० मिनिटे अगोदर मी पोचले होते.  Fumiko sensei ला शोधू लागले. 
तिला उशीर होण्याचा प्रश्नच उद्भवू शकत नाही.... देवही स्वतःचे घड्याळ Japanese प्रमाणे set करत असणार ह्यात काहीच शंका नाही.... 

"Konnichiwa !" म्हणत आम्ही कमरेतून वाकून नमस्कार केला. 

Fumiko sensei हसली ,"I am taking you to a place which is not very known to the tourists. And I am confident you will get a great surprise once you see that." 

 नव्या दमाने नवीन काहीतरी अनुभवण्यासाठी मी Fumiko sensei सोबत चालू लागले. Sensoji shrine आम्ही केव्हाच मागे टाकली. 

चालता चालता Fumiko sensei म्हणाली," We will take around 9/10 minutes to reach to that place. Meanwhile I will tell you an interesting story."

मी कान  देऊन ऐकू लागले. 

"We are walking towards a temple named Honryuin temple. It's an ancient temple located on a small hill overlooking Sumida river. This temple and location is very local. The story behind this temple is very mysterious, some say its mythical but we, Japanese strongly believe in it. Do you want to know?"

"Wow ! गूढ कथा ..... " माझी उत्सुकता वाढत होती. चढण लागल्याने ती आणि मी जरा दमाने घेत होतो. 

" This hill is called Matsuchiyama. Japanese buddhists worship this hill and the shrine. They believe that somewhere during 6th century this hill erupted. This hill is so sacred that a golden dragon flew down from the heaven to protect it."

चढण असल्याने Fumiko sensei च्या बोलण्याचा आणि आमच्या  चालण्याचा वेग संथ झाला होता मात्र मी त्या कथेत गुंतले होते," So what happened after that?" Fumiko sensei श्वास गोळा करे पर्यंत माझा प्रश्न तयारच होता. 

ती हसली ," After many years during the summer there was a terrible drought in this area. People were suffering and going through hardships. They were praying the almighty to send a saviour. And "HE"appeared....."

"HE...... who HE?" Sensei ची कथा अजूनच रहस्यमय झाली होती. 

Fumiko sensei थांबली. मी अस्वस्थ झाले. तिने हसून तिचा हात एका दिशेला वळवला. 

आम्ही डोंगराच्या माथ्यावर एका सुंदर देवळा समोर उभे होतो. 

              
                                                          www.ambassadors-japan.com

सर्वत्र हिरवे गार ..... आजूबाजूला तुरळक हालचाल आणि निशब्द शांतता.... 
पाहता क्षणी मला गोव्याच्या देवळांची आठवण झाली. 
गाभाऱ्याची ओढ लागली.... सगळ्या शंका कुशंका, प्रश्न गारव्यात विरून गेले. 

"Do you want to know who "HE" is?" Fumiko sensei हसली. 
खरंतर त्या देवळाचे रूप च इतके  सुंदर होते  की  माझा प्रश्न हरवला होता . 

आम्ही दोघी पायरीवर बसलो. "HE appeared.... HE ,who is the destroyer of evil....HE, who is the God of joy.... HE, whose glance turns you calm.... And you know him well....." 

Fumiko sensei हसत होती मात्र मी अधीर झाले होते.... "Who ?"

"HE is the one who ended the drought immediately .... He is the one who spreads joy...He is the one who helps you when you are in deep trouble in life.... He is the one who gives you an energy to love all.....
HE has many names. Lets see if any of them reminds you of someone special."

"Sensei , please tell me quickly. I am so eager and impatient."

"Hold your breath..... HE is "Kangiten (God of bliss) or you can address him as "Sho-ten (sacred god" or " Daisho-ten (noble god) or "Tenson (Venerable god) or "Vinayaka-ten" , "Binayaka-ten" and this is the one .... you  will immediately know..... "GANAPATEI.... GANABACHI !"

माझा श्वास खरंच थांबला होता. सभोवतालचा गारवा अधिक जाणवू लागला. अंगावर शहारे उभे राहिले...... 
"आपला ......माझा "गणपती बाप्पा "..... तो सुद्धा साता समुद्रा पलीकडे....?! स्वप्न तर नाही ना हे?" 

"Sensei, summimasen...... Do you mean "Ganesha.... the elephant head god? How come?"

Fumiko sensei शांत पणे हसत माझ्या कडे पाहत होती. 

"Daisho Kangi ten is the avatar of Eleven faced Kannon Bodhisattva(god of mercy). 'Ekadasamukha' is a Buddhist version of Ganesha. He grants all the wishes to his followers."  

आम्ही देवळाच्या पायऱ्या चढू लागलो. देवळात शिरल्या वर दोन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष वेधले गेले; छतावर रंगवलेले  प्रचंड पंख पसरलेल्या dragon चे चित्र आणि गाभाऱ्या समोर रचलेल्या जाड्या जुड्या पांढऱ्या मुळ्या चा डोंगर...... 
मोदक , जास्वंद कुठेच दिसत नव्हते....    


                Hindu Cosmos — 待乳山聖天 - Honryuin Matsuchiyama Shoden, Tokyo The...
                                                                                                         /hinducosmos.tumblr.com

सर्वत्र मुळ्या ची चित्रे होती.... भिंतींवरच्या कलाकुसरीत, जागोजागी लटकणाऱ्या कागदी कंदिलांवर .... पाहावं तिकडे
 मुळे च मुळे ..... 
म्हणजे Japanese गणपतीला मोदक नाही "मुळे " आवडतात तर.... !

"Fumiko sensei, In India we offer a sweet rice dumpling to Ganesha. Can you tell me more about these radishes?"

"Oh!!!! You can say , Kangi ten likes to eat daikon ; radishes instead of sweet rice dumplings...... a little healthy choice, isn't it?"  Fumiko sensei बरोबर मीही मनापासून हसले. 

" Radish is a staple to Japanese. White colour of radish reflects purity of the divine. It is also a symbol of strength, health, virility."

Sensei चे शब्द कानांवर पडत होते मात्र माझे डोळे आपल्या गणपतीला जपान मध्ये पाहण्यास आतुर झाले होते. आनंद गगनात मावत नव्हता. "Where is Kangi ten, I mean my ganesha's idol?"

"I am sorry.  Kangi ten is considered so sacred and holy that his idol is kept hidden and hence no one can see the idol."


                                     Kangiten is often depicted as two elephant headed figures hugging each other. Image: 1690; Source: 仏像図彙; Public Domain
 Kangiten is often depicted as two elephant headed figures hugging each other. Image: 1690; Source: 仏像図彙; Public Domain www.asakusastation.com

"अरेच्या ! आपला गणपती बाप्पा जपान मध्ये लपवून ठेवतात? 
आपण  तर गणेश चतुर्थीला "सुंदर ते ध्यान" म्हणून डोळेभरून निरखत असतो. " 
ह्या परक्या देशात माझा , अगदी हक्काचा आणि जवळचा गणपती बाप्पा आजू बाजूला आहे पण बघू शकत नाही ह्या विचाराने मी खूपच बेचैन झाले. पण "तो" आहे ह्याचा आनंद हि वाटत होता. 

देवळात आजूबाजूला मुळ्यांसोबत अतिशय सुरेख, छोट्या छोट्या रंगेबेरंगी पिशव्या नीटनेटक्या ठेवल्या होत्या. 

"These small pouches contain money and called as Kinchaku. Its an offering to Kangi ten for business success." अगरबत्ती गाभाऱ्यासमोर धरून नतमस्तक होऊन sensei  म्हणाली. 

 मी  "त्याचे" अस्तित्व सर्वत्र शोधू लागले .... 
त्या लाकडी देवळाच्या इमारतीत, अगरबत्तीच्या गंधात, बाजूच्या रेखीव हिरव्यागार जपानी बागेत, तिथल्या स्थिर तळयात , त्यात केशरी माश्यांनी तयार केलेल्या वलयांत  आणि त्या टेकडी वरून दिसणाऱ्या अदभूत टोकियो च्या शहरात..... 

शांत चित्ताने ,हसत मुखाने मी हात जोडले... न पाहू शकणाऱ्या गणपती बाप्पा समोर , सभोवतालच्या जादुई निसर्गा समोर आणि माझ्या गुरु समोर; Fumiko sensei समोर.... 

 डोळे आपोआप मिटले गेले आणि तितक्यात काहीतरी चमत्कारिक घडले... 
"त्याने" त्याची प्रचिती दिली..... 
"चुकक चुककक चुकक "आवाज झाला.... माझ्या डोळ्या समोर एक इवलासा उंदीर इकडून तिकडे पळत होता आणि क्षणात बिळात नाहीसा झाला. 

"अनादी तू... अनंत तू.... सगुण तू... निर्गुण तू.... तूच सखा.... सर्वत्र तू!"

मी हि जपानी गणपती बाप्पाला एक भरीव मुळा आणि काही yen घालून Kinchaku अर्पण केले आणि दृष्टीपलीकडल्या पण जाणवणाऱ्या विघ्न विनायकाला साष्टांग लोटांगण घातले. 

  




Thursday 30 July 2020

Binayaka ten बाप्पा मोरया




                                           ©swatithakur
    

                                                                      ©swatithakur 


स्थळ: माझे घर, Komazawa , Tokyo, Japan 

ऑगस्ट, २०११ च्या एका सोमवारी सकाळी बरोबर 9 वाजता घड्याळाचा ठोका पडला आणि त्या क्षणी माझ्या घराची door bell खणाणली.  पहिल्या मजल्या वरच्या video phone वर मी दारावरील आवाजाला "hai" असे बोलून माझे अस्तित्व जाणवून देऊन पटकन पायऱ्या उतरत दारा पाशी पोचले. 

ती Yukiko sensei नव्हती. 
Yukiko sensei .. बुटकी, गोरी पान , अतिशय नीट नेटकी , साठीतील जपानी sensei !
 दिसायला जितकी smart तितकीच उत्तम शिक्षक. English आणि Japanese दोन्ही भाषांवर प्रभुत्व !
 बँके कडून नेमून दिलेली  culture आणि language शिक्षकाची भूमिका Yukiko sensei चोख बजावायची. 
 Japanese भाषे सोबत त्यांची संस्कृती , जपानी पद्धती, जपानी शिष्टाचार, अगणित किस्से कहाण्या आणि शेवटी  एक origami शिकवायची. 

 पण आजचा  चेहेरा वेगळा होता ... Yukiko sensei पेक्षा बरीच उंच होती ती... मात्र जपानी रंग रूप जवळपास तेच.... लांबट बदामासारखे  डोळे .... अतिशय व्यवस्थित बांधलेले केस ....चेहेऱ्यावर दिसेल असा तरीही  पुसटसा makeup , लाल चुटुक ओठ .....  एका हातात दिसायला साधी पण अभिमानाने बाळगलेली स्वछ कापडी पिशवी आणि दुसऱ्या हातात अतिशय नाजूक फुलांचे शिवण काम केलेली उन्हाळ्यातील छोटीशी  टुमदार छत्री! हास्य तेच ...बोलण्यातील अदब, लय, ठेका आणि नम्रता तीच.... 

जपानी मान शिष्टाचारा  प्रमाणे थोडीशी झुकवून हळुवार पणे तिने स्वतःची ओळख पटवली ," Ohio gozaimasu! Ogenki desu ka? Watashi no namae wa Fumiko desu. " माझ्या कडे हसून बघता बघता तिने छत्री पद्धतशीरपणे गुंडाळून ठेवली. " I am substituing Yukiko sensei as she is busy for this week." म्हणताना तिने आपल्या चपला एकमेकांना जोडून शिस्तीत कोपऱ्यात ठेवल्या. 

माझी जपानी tuition दारातच चालू झाली होती. "Ohio gozaimasu, Fumiko sensei ! Wonderful to meet you . Please come in ."

Fumiko sensei मागे आणि मी पुढे अश्या  पायऱ्या चढू  लागलो . 

तळमजल्यावरून पहिल्या मजल्या वर पोचायला वळण दार २४ पायऱ्या होत्या. साधारणतः १२ व्या पायरीच्या वळणाशी पोचल्यावर  सर्वात अगोदर गणपतीच्या अतिशय सुबक मूर्तीचे दर्शन घडायचे. तेच उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आम्ही ती मूर्ती तिथे ठेवली होती. 
आमचे Indian मित्र आल्या  क्षणी ती मूर्ती पाहून भारावून जायचे. हळू हळू मला ती प्रतिक्रिया तोंङपाठच झाली होती.  

मी आणि Fumiko sensei त्या बाराव्या  पायरीवर पोचता क्षणी "Sugoi ne !" हे आश्चर्य कानावर पडले. 
माझा उर अभिमानाने भरून आला.  पुढील १२ पायऱ्या मी स्वःताला शाबासकी देत आणि भारतीय संकृती , आपले देव आणि थोडक्यात आपण भारतीय किती महान आहोत असे विचार करत चढले.

पहिल्या मजल्यावर पोचता क्षणी जणू काही गणपती मार्गदर्शक असल्या प्रमाणे त्याच्या उजवी कडे   lounge area आणि डावीकडे  open kitchen आणि dinning table अशी विभागणी होत असे.  मी डावीकडे  वळले. Fumiko sensei मागे आहे हे गृहीतच धरले. 

टेबलापाशी पोचल्यावर पाठी वळून पाहिले आणि मी तिथेच थबकले. " अर्रे! ही पडली कि काय? आता काय करू? " मनाचा गोंधळ उडाला. 

Fumiko sensei जमिनीवर चक्क आडवी होती. मी पटकन पाण्याचा glass घेऊन तिच्या पाशी गेले. 
" Fumiko Sensei ..... Fumiko sensei.... are you ok? Are you feeling fine? Please drink this water. " तिच्या पाठीवरून हात फिरवू लागले. 

२/३ मिनिटे तिने काहीच हालचाल केली नाही. ती इवलीशी मिनिटे मला ब्रह्मांड रूप दाखवत होती. तो पर्यंत शिकलेले सगळे जपानी शब्द मी गोळा करू लागले. Ambulance ला काय बरं म्हणतात , तातडीने मदत हवी आहे हे वाक्य Japanese मध्ये कसे म्हणू शकते ..... त्या क्षणी "Japanese miserably failed " असा शिक्का मला दिसू लागला.  माझा phone सुद्धा unlock होत नव्हता. मी समोर उभ्या गणपतीची आणि आडव्या झालेल्य Fumiko  sensei ची  विनवणी करू लागले.  

जागचा न हलता गणपती रोखून माझ्या कडे पाहत होता पण त्याच्या कृपेने Fumiko sensei मात्र हलली. 
माझ्या जीवात जीव आला. रडू कि हसू ते कळत नव्हत. मात्र त्या वेळी माझा जपानी भाषेचा प्रवास सुरु न होताच संपला ह्याचा प्रचंड आनंद झाला. 

आडवी झालेली Fumiko sensei आता चक्क मांडी ठोकून बसली. ती पाणीही प्यायला तयार नव्हती. तिचा श्वास चालू आहे हे पाहून माझा श्वास नियमित झाला. 

" Fumiko sensei , hope you are feeling fine. I am sorry but I don't know how did you fall? 
 Should I give you a hand to get up? We can cancel today's class. But please get up and sit on the sofa." नुकत्याच सापडलेल्या एका श्वासात मी सगळे सांगून टाकले. 

Fumiko sensei अजूनंही स्मित हास्य करत ध्यान लावून बसली होती. आता मात्र मी जराशी अस्वस्थ झाले .... 
" आमची ओळख ५ मिनिटांची... त्यातून substitute sensei .... माझे सेशन तर कुठच्या कुठे हरवले आणि ही बया काही बोलतही नाही."

Fumiko sensei ध्यानस्थ अवस्थेत आणि मी चुळबुळ , गोंधळलेल्या अवस्थेत !

काही वेळाने Fumiko sensei चे डोळे  उघडले.... तो पर्यंत माझा मात्र "तिसरा डोळा " उघडण्याच्या तयारीत होता . 

"Swati san...... Domo arigato gozaimasu!" Fumiko sensei हात जोडून उठून उभी राहिली आणि सर्वत्र काही तरी शोधू लागली. 

"खरंच हिला भोवळ आली होती बहुदा.... पडल्यामुळे डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. 
मला "Thank you very much.... ते सुद्धा ठासून ..... कश्या साठी????? 
पाण्या साठी ???? आणि काय शोधते आहे ही माझ्या घरात ?"

आणि Fumiko sensei  उवाच," Swati San, You are an Indian..... You are so fortunate." 
मी भारतीय म्हणून जन्माला येण्यात माझा काहीच पराक्रम नव्हता आणि मोठ होत असतानाही भारतीय म्हणून मी दैदिप्यमान अस काहीच केल्याचे आठवत नव्हते. असो.... 

"I am blessed and fortunate to have Ganesha's darshan. Where are his parents?  
Can I touch his feet? Is it fine if I touch him?" ,  आनंदाश्रू डोळ्यात साठवून Fumiko sensei मला विनवीत होती. 
"And I did not fall down. I bow down in front of Binayaka ten." 

"Parents of Ganesha ? Bow down???  बाईंनी चक्क साष्टांग नमस्कार घातला गणपती पुढे?  
आपल्या गणपतीचे जपानी नाव?????.... ....अरे ...चाललंय काय? संचारल का बाईंच्या अंगात?"
 मी सुद्धा नकळत  तिच्या बरोबर "शिव पार्वतीची" जोडी शोधू लागले. 

"Do you know Ganesha?  I mean ..... I know .... Ganesha is known as elephant god among foreigners but how do you know about his parents? Do you know their names? I can tell you the stories about Ganesha and his parents." पायऱ्यां वरचा 'मी भारतीय आणि मला सगळे माहित आहे' ह्याचा अभिमान परत उफाळून आला.  

आणि त्या नंतर "देवी Fumiko  Sensei " ने बोलायला सुरुवात केली.....  अच्युताचे विश्व रूप दर्शन पाहताना मंत्र मुग्ध झालेल्या धनंजयच्या अवस्थेची जाणीव त्या क्षणी मला झाली. 

" I have spent 15 years exploring Northern India especially Varanasi, Nalanda, Bodhgaya, Sarnath, and even Char dham yatra. The most memorable trip was to visit mansarovar  and witness rising sun on Kailash parvat."

Fumiko sensei च्या डोळ्यांमध्ये अतिशय चमक दिसू लागली. ते मिचके डोळे आता मोठाले झाले होते. ती एका दमात मोठ्या अभिमानाने तिचा आता पर्यंतचा प्रवास आणि अभ्यास सांगत होती. 

" During my youth days I travelled all over India extensively and learnt sanskrit. I am a degree holder in sanskrit. I have read many Indian scriptures and  know almost all the gods and their amazing stories."

माझी दहाही बोटं तोंडात घालायची बाकी होती," आणि काही वेळा पूर्वी मी 'हिला'  भारत आणि त्याची संस्कृती  ह्या बद्दल सांगणार होते?!"

" Swati san, I am sure you must have learnt sanskrit.... what a great language!" 

" काय सांगू जपानी बाईंना ?!.... शाळेतील २/३ वर्ष मी शंभर मार्कांचे संस्कृत घेतले होते आणि ते सुद्धा भाषे साठी नव्हे तर दहावीला scoring subject म्हणून." माझी मलाच लाज वाटू लागली. 

"Fumiko sensei  ....  I want to know more about your travel experiences. "

"I am Japanese by birth but I feel I am an Indian by heart. I love everything about India. 
I have read Bhagavad Gita , tried to know its meaning. It always amazes me how Gita is relevant in shaping my life decisions and day to day life. "

आजचा Japanese चा क्लास Indian mythology आणि ancient history मध्ये convert झाला होता. 

उगवत्या सूर्याच्या भूमी वर ५००० वर्ष्यांच्या भारतीय संस्कृतीची मला नव्याने ओळख होत होती.  Fumiko sensei साठी आणलेल्या पाण्याची गरज मलाच जास्त होती. 

बराच वेळ जपानी बाई माझा वर्ग घेत होत्या. पटकन त्यांचा हळुवार आवाजात उत्साह संचारला," Swati san , do you know there are so many temples and shrines of Indian gods and goddesses in Tokyo and all over Japan? We too admire and respect Ganesha."

संस्कृत पदवी धारक जपानी बाईंनी माझी बोलती कधीचीच बंद केली होती. माझे आश्चर्य डोळ्यांनी व्यक्त करत अस्पष्ट पणे  मी मान नकारार्थी हलविली. 

मला माहित असलेला 'थोडाफार' भारताचा इतिहास आणि भूगोल ही पुसून गेला होता..... जपानचा इतिहास भूगोल तर खूपच लांबची गोष्ट !!! 

Fumiko sensei  चा उत्साह तिच्या तोंडून भराभर बाहेर पडणाऱ्या शब्दांमधून जाणवत होता, " No problem, Swati san! I can take you to those temples and shrines. You will be greatly surprised."


आजचा धक्का पचवणे मला कठीण जात होते. तितक्यात एका तासाचा टोला पडला आणि Fumiko sensei  शुद्धीवर आली. 

माझ्या japanese session वर पाणी फिरलं होते.

मात्र भारता  पासून ६५००-७००० km दूर मला जपानी गणपती बाप्पा भेटणार ह्या कल्पनेनेच मी भारावून गेले होते. 

Fumiko sensei ला दारापाशी सोडताना आता परत आमची भेट जपानी देवळां मध्ये होणार ह्या विचाराने मी खूप खुश झाले. 

Binayaka ten बाप्पांचा जय जयकार !

To be continued........












Friday 17 July 2020

आई, छोटुकली आणि 'छोटुकलीची ताईईई '

 
                                           

Mumbai local
moresamidhaDoodle-o-sophy: Mumbai Local Train - The Ladies Compartment


मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी oxygen इतकीच महत्त्वाची !
प्रत्येका कडे किमान एक तरी लोकल चा किस्सा असतोच ..... 
आजची गोष्ट वाचताना नक्कीच तुम्हाला तुमचा local चा किस्सा आठवेल....... 


पार्ल्यात घर असणे म्हणजे "Owner's pride Neighbor's envy".😈
माझ्या आजोबांनी १९५२ मध्ये पार्ल्याला एक टुमदार बंगला बांधला.  चार  भाडेकरू आणि दुसरा संपूर्ण मजला आमचा. खूप हवेशीर आणि मोठं घरं आणि तेव्हढीच मोठ्ठी गच्ची .... आणि त्यात एक मोठा झोपाळा !
 मोठ्ठाली गच्ची आणि झोपाळा असलेले घर असल्याने मी शाळेत एकदम famous होते.
ह्या सामराज्य च्या दोनचं 'राजकन्या '......मी आणि छोटुकली  . 

आजची गोष्ट आहे पार्ल्याच्या दोन 'राजकन्यांची '.
 खूप वर्ष्यांपुर्वी जेव्हा मी साधारण ७/८ वर्ष्यांचे होते आणि छोटुकली  अवघी २/३ वर्ष्यांची होती. 
शाळा आणि घर हा नेहेमीचाच  प्रवास सोडला तर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आमची स्वारीं Churniroad ला आत्येकडे जायची. माझी आई , तिचा हात पकडून मी आणि कडेवर छोटुकली !  बाबा office मधून direct आत्ये कडे पोचायचे. 

अश्याच एका शनिवारी आमची स्वारी निघाली Churniroad ला. 
पहिला टप्पा घरापासून पार्ले station चा पायी प्रवास. 
त्या वेळी रिक्षा हा प्रकार माहितंच नव्हता. आई धावत असायची पण मला आजूबाजूला बघतं बघतं चालत  तो प्रवास खूप आवडायचा.  छोटुकली  तर काय .... आईच्या कडेवर बसून इकडून तिकडे फक्त मान फिरवायची ! माझे पाय दुखले कि तिचा हेवा वाटायचा. एक दोनदा आईला मस्का लावण्याचे व्यर्थ प्रयत्नं ही करून व्हायचे. 

आमची स्वारी स्टेशन ला पोचली कि प्रवासाचा दुसरा टप्पा....ladies compartment मध्ये दाखल होणे. 

त्या शनिवारी का कोण जाणे पण platform वर खूपच गर्दी होती.  साडी, purse ,खांद्यावर छोटुकली  आणि हाताशी मी हे सर्व सांभाळत गाडीत शिरण्या साठी माझी आई तयार होती.  माझ्या कडे न बघता ती अखंड वेळ पुटपुटत होती," गर्दी असली किंवा नसली तरी गाडी आल्यावर पटकन गाडीत शिर. इथे तिथे बघत बसू नकोस. नाहीतर राहशील platform वरच. मला छोटुकली ही सांभाळायचं आहे ."  मी तरीही आजूबाजूला बघतच होते.  मी आपली माझ्याच स्वप्न नगरीत होते. 
"येतेय ती train churniroad ला थांबणार  ना? " असे संभाषण माझ्या  आईने दोन तीन  बायकांशी करून झाले होते.  ती थोडी बावरलेली वाटत होती. 
मलाचं तिच्या हाताची गरज असल्याने मी काय धीर देणार तिला ?!

आणि शेवटी ती गाडी platform वर थांबली आणि तो पर्यंत एकमेकांशी हसून खेळून बोलणाऱ्या बायका एकमेकांना ढकलून डब्यात शिरू लागल्या.  पुढची २/३ मिनिटे नक्की काय झाले ते मला कळलेच नाही.  मी चिटुकली पिटुकली असल्याने त्या गर्दीतुन वाट काढून डब्ब्यात शिरले. आणि train चालू झाली. 

काही सेकंदातच डब्यातील बायकां स्थिरावल्या. आणि माझ्या लक्षात आले कि माझा हात आईच्या हातात नव्हता. 
लगेच डोळ्यात पाणी साठले. "आई ...आईईईई ..... कुठे आहेस तू ?" अशी आरोळी ठोकून मी जोरात भोकाड पसरलं. 
काही मिनिटांपूर्वी भांडणाऱ्या बायकां अचानक सावध झाल्या. "काय झाले? तुझी आई कुठे आहे? ती चढली का या डब्यात कि platform वरच राहिली? कुठे जायचे आहे तुला?" प्रश्नाचा भडीमार सुरु झाला. मी अजूनच रडू लागले. 
मला आईचे शब्द आठवू लागले," माझा हात अजिबात सोडायचा नाही. तू मोठी आहेस ना छोटुकली पेक्षा ?! मग नीट वाग. एकट्या मुलांना पळवून घेऊन जातात." 
 मला आता कोणीतरी पळवून घेऊन जाणार ह्या भीतीने मी 'आईईईई , छोटीईईईई  ,बाबाआआ ,आजोबाआआ " सगळ्यांचा धावा करू लागले. 

गाडी वेगाने धावत होती. मी तितक्याच वेगाने रडतं आणि हाका मारत होते. चेंगरा चेंगरीच्या गर्दीत मी एकटी होते. काय करायचे ते कळतं  नव्हते. मला गाडी थांबवायची होती. पण मी होते इवलीशी. 
"उडी मारू का?" का "chain खेचु ? पण असते तरी कुठे ही Chain?"  माझा मलाच खूप राग आला. "का नाही माहित मला chain कुठे आहे?  बरं ....समजा मला chain सापडली तरी एव्हाडाली लांब लचक train माझ्या ताकदीने थांबेल का?" ह्या सगळ्या विचारयांच्या वादळांत शेवटी मला साक्षात्कार झाला ..... 
"माझ्या बारीक हातातल्या शक्ती पेक्षा माझ्या गळ्यातल्या रडण्याला अधिक शक्ती आहे." 
And the weeping and crying continued ....... 

 माझ्या मते किमान 'एक वर्षयांनी' Santacruz स्टेशन वर गाडी थांबली. आता एक नवीन प्रश्न ' ह्या रडणाऱ्या मुलीचे काय करायचे?'  आणि डब्बयातील बायकांनी सहमताने ठराव मांडला. 
मला एकच काम होत...... 'बेंबीच्या देठा पासून जोरात रडणे आणि ते मी अतिशय मनापासून करत होते.' 
ठरावा प्रमाणे एक मावशी मला घेऊन स्टेशन वर उतरली. तिने  station master  शी बोलून त्यांना  सगळा गोंधळ सांगितला. 

परत एका नव्या ठरावा नुसार ती मला हाताशी धरून प्लॅटफॉर्म वर ladies comparment च्या समोर उभी राहिली.  
"रडू नकोस ? बघ ,ते काका आता तुझ्या आईला कळवतील आणि पुढच्या ट्रेन ने तुझी आई इथे येईल."  मावशी धीराने गाडीची वाट पाहत होती.  आता माझ्या डोळ्यातून कमी आणि नाकातून धारा वाहू लागल्या होत्या. 

आणि मला एक गाडी platform मध्ये शिरताना दिसली. 
"ह्या मावशी म्हणतात त्या प्रमाणे असेल का माझी आई आणि छोटुकली ह्या गाडीत?  त्यांना कळले असेल का मी इथे आहे?  नसेल ...  तर काय?"  ह्या विचारात असतानाच गाडी थांबली आणि त्या प्रचंड मोठ्या झुंडात मला दोन ओळखीचे कावरे बावरे झालेले चेहेरे दिसले. उरली सुरली सगळी शक्ति पणाला लावून मी जोरात हाक मारली,"आईईईईईई"..... " आईला पाहून एवढा आनंद मला त्या आधी कधीही झाल्याचे आठवत नव्हते. 

आलेली गाडी निघून गेली.  तिथे उरलो ते ;मी, माझी आई , छोटुकली , त्या मावशी, Station master काका आणि आई सोबत आलेले पोलीस काका . 

मी आईला घट्ट मिठी मारून जोरात रडू लागले. मावशी आणि काका मनापासून खुश झाले होते. आई ने रडवेल्या आवाजात आणि थरथरणाऱ्या हातांनी मावशी आणि काकांचे मनापासून कितीतरी वेळा आभार मानले. 

आता काय मी खुश ! सगळ्यांना वाटले की समारंभ संपला ....'Happy ending'

पण story अभी बाकी हैं मेरे दोस्त 😎😎😎 

सगळे शांत झाल्यावर एक जोर दार स्वर सर्वत्र पसरला ......"माझी ताईईई .... 😢😢😢😢😢"

छोटुकली  ला रडताना पाहून आम्ही सगळे जोरात हसू लागलो. 

शेवटी आम्ही सगळे आत्येकडे पोचलो. 

पण त्या दिवस नंतर train आणि आत्येला visit  ह्या बरोबर आमचे adventure  नक्की आठवले जाते. 

आता बरेच काही बदलले आहे पण ताई साठी मारलेली ती प्रेमळ हाक, आईला मारलेली घट्ट मिठी आणि आईच्या अश्रूंमुळे भिजलेलं माझे हात मात्र बदलले नाहीत. 
आजही मुंबई लोकल तीच , तशीच आहे ...... मुंबईची lifeline आहे. 
आजही कितीही गर्दी असली तरी 'ती' आपलीशी वाटते. 

आमचे त्रिकुट अजूनही एकमेकां बरोबर असते. एकमेकांचे हात आम्ही घट्ट पकडून असतो. मनाने प्रत्येक क्षणी एकत्र असतो. 

आणि हो....
 मी त्या नंतर किती तरी दिवस बाहेर पडताना माझ्या चप्पलां ऐवजी आई च्या चप्पलां कडे लक्ष ठेवले. 
कारण ही गोष्टं आहे आईच्या एका पायातली चप्पल platform वर खाली राहिल्याने घडलेल्या adventure ची 😇😄😄😄






 

Friday 10 July 2020

Japanese Tendulkar


       
                     


Komazawa हे Tokyo मधील एक  छोटंसं आणि टुमदार suburb. ह्या उपनगरात  English सापडणे  जरा कठीणच. 
Komazawa चे रहिवासी दोन गोष्टींचा अतिशय अभिमान बाळगतात. पहिली गोष्ट ,university ज्या मुळे येथील train station चे नाव "Komazawa daigaku "ठेवले गेले आहे. 
आणि दुसरी , सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "Komazawa Olympic Park ". 
Komazawa मधील प्रत्येक रहिवासी मोठ्या ताठ मानेने "मी Komazawa Park च्या बाजूला राहतो." असे सांगत असतो. 

1964 ला Summer Olympic साठी Komazawa Park उभारल गेले. तब्बल 413,537 square metres (4,451,280 sq ft) क्षेत्रफळाचे  हे पार्क Komazawa ची शान आहे. त्याच्या घेराला लागून टुमदार , परीकथेतली जपानी घर वसलेली आहेत. 

जे काही मागाल ते ह्या park मध्ये मिळेल.... २०,००० क्षमतेचे stadium , swimming pool , tennis courts , लहान मुलांच्या खेळण्या साठी स्वतंत्र जागा , baseball ground , Cherry blossom ची असंख्य पण शिस्तीत  उभी झाडे, आणि त्याच्या परिघाला लागून तीन अधोरेखित lanes ; पहिली cycling साठी, दुसरी  joggers साठी आणि तिसरी चालणाऱ्यांसाठी ..... त्या मोकळ्या , कुंपण विरहित आणि अफाट पार्कलाही जपानी शिस्त आहे.... 
 ते सर्वांना स्वतःत सामावून घेते. 
दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तिथे भरपूर माणसं असतात..... काही धावणारी, काही चालणारी, काही खेळणारी, काही निवांत बसलेली, काही पुस्तकांत रमलेली, काही निसर्गाचा आनंद लुटणारी, काही स्टेशन , घरांकडे  ये जा करणारी  ..... 

जुलै २०१० ला आमचे विंचवाचे बिऱ्हाड Hong Kong हुन Tokyo ला आले. Komazawa आणि  त्यातील एक सुंदर घर पहिल्या भेटीतच आम्हाला आवडले , आपलेसे वाटले. आमचे घर Komazawa Park पासून २ मिनिटांच्या अंतरावर होते. माझी सकाळ, आदित्यची संध्याकाळ आणि आमचे शनिवार , रविवार ह्या Park मध्ये रमत असत.

 चार वर्ष्यांच्या वास्तव्यात ह्या  छोट्याश्या suburb मध्ये मी सोडून एखादाच भारतीय दिसला . 
पार्क मध्ये  भारताचे प्रतिनिधित्व करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्या एकटीवरच होती.  नित्य नियमाने दर सकाळी  मी Komazawa park मध्ये जॉगिंग साठी जायचे. साधारणतः वेळेप्रमाणे ठराविक चेहेरे ओळखीचे झाले होते. हास्य  आणि मानेची सहज हालचाल करत "Ohayo gozaimasu" म्हणत सुप्रभात ह्यांची अगदी सहज देवाण घेवाण  होत असे. 

अशीच एक November २०१३ मधील सकाळ.... बोचरी थंडी, पानं गळून उदास वाटणारी  झाडं , काळ्या ढगांनी अजूनच काळोखी वाटणारं आभाळ.... हात चोळत, उब घेत मी धावायला सुरु केले. डोळ्यांच्या कडेने ओळखीचे चेहेरे पाहत अंतर कापत  होते. 

 संथ गार बोचरा वारा , ती ओकी बोकी झाडं आणि काळोखा मुळे मुंबईची, घराची खूप आठवण येत होती. Park मध्ये येण्याआधी सचिन तेंडुलकर ची शेवटची Match , त्याचे क्रिकेट जगातला , त्याच्या fans ला उद्देशून म्हटलेले मनस्वी निरोपाचे भाषण बघितले होते. मन रमत नव्हतं. मुंबईतल्या Wankhede stadium मधील "सचिन...सचिन..." चा उदघोष मला Komazawa Park मध्ये ऐकू येत होता. जगभरच्या सचिन प्रेमीं सोबत मी ही हळवी झाले होते. 

मी माझा नित्यक्रम आटोपता घेतला. आणि एका Bench वर शांत बसले. जवळच एका जाळीदार बंद छोट्याश्या मैदानात Gateball  चा खेळ चालू होता.  तो खेळ आणि त्यातील खेळाडू आता मला तोंडपाठ झाले होते. आमची तुरळक शब्दं आणि  दररोजची हास्याची ओळख होती. 

Komazawa मधील आजी आजोबा एकत्र येऊन अतिशय नीट नेटके पणे , नियमांनुसार हा खेळ खेळायचे. त्या आधी एक आजोबा मैदान स्वच्छ करायचे. एक आजी Gateball साठी लागणाऱ्या १० balls पैकी लाल रंगाचे odd नंबरचे balls आणि पांढऱ्या रंगाचे even नंबरचे balls रीतसर पणे वेगेवेगळे करायची. अजून एक आजोबा तीन gates आणि एक goal post रचून ठेवायचे. तोवर बाकी आजी आजोबा हातोड्यासारख्या दिसणाऱ्या bats घेऊन  त्यांना join व्हायचे. 

माझे jogging संपण्याची वेळ आणि जागा ही आजी आजोबांच्या Gateball  संपण्याच्या वेळेशी संलग्न होती. 

त्या दिवशी मी शून्यात हरविली असताना एक आजोबा माझ्या शेजारी येऊन बसले,"Summimasen ! Ogenki desu ka ?"
त्या प्रेमळ विचारपूस सरशी मला खूप भरून आले. मी कसे बसे त्यांच्याशी हसले. 

"Anata wa Indo jin desu ka ?" हळूच असे म्हणत आजोबांनी  मी Indian असल्याची पुष्टी करून घेतली . 
मी जरा गोंधळून होकारार्थी मान  डोलावली. ते  मोडक्या तोडक्या english ,मधेच Japanese शब्द वापरून बोलू लागले. 

"I love Sachin Tendulkar from your country." त्यांचे वाक्य पूर्ण होत असतानाच मी माझे सगळे आश्चर्य एकत्रित करून विचारले," Ojiisan, Do you know anything about cricket? Do you play or follow the game?"

"Chotto !" आपले ओठ चुंबू करत मिचके डोळे अजूनच बारीक करत बोटांची चिमूट करत आजोबा म्हणाले.  

 Chotto  याचा अर्थ 'नाही' नसला तरी  "नाही" असा घ्यायचा असतो हे आताशी मला तोंडपाठ झाले होते. 

माझी उत्सुकता अजूनच वाढली आणि मी त्यांचे  शब्द काळजीपूर्वक ऐकू लागले. 
 भाषांविषयीचे होते नव्हते ते ज्ञान वापरून आजोबा म्हणले ," I respect  Sachin Tendulkar as a human being.
I don't know much about the game of cricket other than its spelling. But I am a sport enthusiast and do read a lot about games in general. And that is how I knew about cricket and the aura and glory of Sachin Tendulkar across the world. He is a great athlete and I have read about him extensively."  

सचिनची स्तुती आपल्या सगळ्यांना पाठ आहे पण बोलायला बुजणाऱ्या जपानी माणसाच्या तोंडातून ऐकणे हे कोण आश्चर्य होतं!
 ज्या देशात  "bat आणि  ball " हे फक्त baseball मध्ये वापरले जातात  असा ठाम विश्वास आहे त्या देशातील एक माणूस सचिन कसा त्याच्या bats आणि pads ला मान देतो हे ऐकणे म्हणजे आठवे आश्चर्य !

आजोबा बोलत होते आणि मी थक्क होऊन ऐकत होते," I read that Sachin Tendulkar maintains all the equipments he uses personally and immaculately. He worships his bats and even carries the pics of Gods in his kit bag. I even read one of his fellow mate saying Sachin preached him not to throw the bat or hammer the bat when you get out. Sachin always touches the ground before batting and even thank God every time he scores big runs. Am I correct?"

मी निशब्द झाले.  जग भर सचिन ची ओळख त्याने रचलेल्या धावांच्या डोंगराने होते. त्याने मोडलेल्या दिग्गजांच्या records ने होते. सचिन ने साध्य केलेल्या world records ने होते. आजोबांनी दाखवलेली ओळख माहितीतली असली तरी सहज जाणवणारी नव्हती. 

जपान मध्ये  Baseball ह्या American खेळावर जीवापाड प्रेम करतात आणि लहानपणापासून खेळतातही. लहानग्या जपानी मुलांकडे Cricket bat ऐवजी  प्लास्टिक ची Baseball bat असते.  Japan मध्ये क्रिकेट हे नाहींच्या बरोबर आहे.  आणि त्यात चक्क  थेट "सचिन तेंडुलकर " हे नाव आणि ते सुद्धा Japanese माणसाच्या तोंडून ?!

आजोबांचे  शब्द त्या गारव्यात विरघळून जात होते . माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी कुठे आहे.... India कि Japan ? 

"I know Sachin Tendulkar retired today. You should be very proud of him. You are so fortunate to come from Sachin's country." आजोबांच्या  हाकेने मला जाग आली . 

आजोबांनी त्या क्षणी आयुष्य किती सहज, सोप्प्या पद्धतीने मांडले. आयुष्य , आपल्या आजू बाजूच्या प्रत्येक गोष्टी गृहीत न धरता त्या समोर नतमस्तक व्हा ..... त्याला समर्पित व्हा .... कृतज्ञता बाळगा अगदी सहज पणे  सांगून गेले. 

मुंबई पासून ६,७२७ km , समुद्रांपलीकडल्या Tokyo मध्ये सचिन सारखीच Value system जोपासणारे आणि त्याचा अभिमान बाळगणारे जपानी आजोबा मला भेटले.  

काही कळण्या अगोदर ते आजोबा माझ्या डोक्यावर मायेचा हात थोपटत बाकीच्या  आजीआजोबांच्या घोळक्यात मिसळून गेले.   मी तिथेच थबकले. त्याची पाठमोरी आकृती डोळ्याआड होत होती. 

 आता मात्र माझ्या चेहेऱ्यावर अभिमान होता, ओठांवर अस्फुट हसू होते आणि  नकळत पुटपुटत होते ..... 


"Domo Arigato gozaimasu , Ojiisan !

I AM SO PROUD TO BE FROM TENDULKAR 'S COUNTRY."











 






Friday 3 July 2020

Fa-Sun आजी

             Central wet market, Hollywood Road, Hong Kong                    
 Central wet market, Hollywood Road, Hong Kong (Photograph: Ray Laskowitz)
 


जुलै २००७ मध्ये Singapore  मधील बस्तान गुंडाळून आम्ही Hong Kong ला आलो. :
"Hong Kong हे एक बंदर आहे, 
Hong Kong ही  British colony होती,
HKSAR म्हणजे Hong Kong Special Administrative Region of the People's Republic of China; One country, Two systems,
आणि Jacki Chan हा मूळचा Hong Kong चा आहे , चा अश्या तुरळक गोष्टी सोडून मला काहीच माहित नव्हते. 

Cathay Pacific चे flight पहाटे  HK एअरपोर्ट वर उतरले. मी कुतूहलाने खिडकीतून बाहेर डोकावून बघत होते. 
सर्वत्र तीनच गोष्टी दिसत होत्या; निळाशार पसरलेला अथांग समुद्र, डोंगरांच्या रांगा आणि डोंगऱ्यांच्या वरती आकाशाला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारतीं ;
Singapore पेक्षा इथला भूगोल खूपच वेगळा दिसत होता. 

Central Hong Kong मध्ये एका सर्विस अपार्टमेंट पाशी पोचलो .  आमची टॅक्सी मावेल एव्हढाच रस्ता ... बाकी सर्वत्र उंचच उंच buildings ..... मान वर करून पाहण्याच्या प्रयत्नात मान पूर्ण काटकोनात पाठी गेली तरीही building चा माथा काही दिसला नाही. 

आमच्या सर्विस अपार्टमेंटची लिफ्ट, आमचे अपार्टमेंट ह्यांचे क्षेत्रफळ इतके कमी होते कि आम्ही किंवा सामान ह्यातील एकालाच जागा होती. 
पटकन मुंबईच्या लोकल ट्रेन च्या सवयीची आठवण झाली  आणि आम्ही त्यातही सुखरूप मावलो . 

दुसऱ्या दिवसापासून आदि आणि मी  HK exploration mission वर निघालो. 

अतिशय निमुळते रस्ते, ते सुद्धा सरळ सोट नाहीतच; कधी चढण तर कधी घसरगुंडी सारखी उतरण !
रस्त्यांवर माणसांची गर्दी अगदी थेट मुंबई सारखी.... आणि त्यांची लगबग, घाई गडबड आणि बडबड ही मुंबई सारखी च.... 
बोलाण्याची भाषा वेगळी असली तरी त्याची लय, टप्पा , ठेका थेट कोकणातला .... 

त्या लहानग्या रस्त्या वरून दोन माणसे एकत्र चालणे म्हणजे दिव्य ! त्यातच लाल रंगाच्या taxis आणि  गाड्या त्या रस्त्यां वरून तारे वरची कसरत करत ये जा करत होत्या. 

Singapore  सोडून Hong Kong ला येण्याच्या दुःखा ऐवजी मुंबई दिसू लागली. अचानक तो रस्ता, तो गोंधळ  आणि ती धावपळ आपलीशी वाटू लागली. 
जमेल त्या angle मध्ये मान जास्तीत जास्त वर करून आजूबाजूच्या buildings ना एकूण किती मजले असावेत ह्याचा अंदाज घेतला. गणित आणि मान पूर्णपणे चुकली आणि मी तो नाद सोडून दिला. 

७ वर्ष्यांचा आदि  त्या गडबडीत गोंधळून गेला होता ," हे आता आपलं नवीन घर का? माझी नवीन शाळा कुठे आहे, कशी आहे? मला मित्र मिळतील का?" 
मला शब्द सापडत नव्हते.... मला ही खूप प्रश्न होते. 
पण मी मनाशी घट्ट गाठ बांधली होती," आता Hong Kong आपले घर आहे आणि सर्व काही नीट होणार."

चालत चालत आम्ही दोघे एका छोट्याश्या गल्लीत वसलेल्या  market मध्ये पोचलो. एक छोटेखानी "Park n Shop " सुपर मार्केट वगळता सर्व दुकान आणि विक्रेते रस्ताच्या कडेला बसले होते.  भाज्या , मासे, फळं , आणि बरेच काही मांडून ठेवले होते.  एक गोल फेरी मारल्या वर आम्ही परत जायला निघालो. 
त्या गल्लीच्या तोंडाशी आल्यावर आदि  अचानक हात सोडून जवळच्या शेंगदाणे विकत असलेल्या आजी कडे धावला. तिने काही तरी बोलत , हात हलवत आदि ला जवळ बोलाविले आणि त्याला शेंगदाण्याची पुडी दिली. 

माझ्यातील मुंबई कर लगेच जागा झाला. आणि सावध नजरेने मी आजीला न्याहाळू लागले. 

Hong Kong ची आजी कमरेतून एकदम वाकली होती. तिचे पांढरे भुरभुरते केस 'म्हातारीच्या केसां 'सारखे भासत होते. हातात आधाराला एक काठी होती. चेहेऱ्यावर, अंगावर, हातांवर सुरकुत्या होत्या.   तिचे मिचके डोळे अजूनच झाकलेले होते..... पण चेहेऱ्यावर अतिशय मनस्वी हास्य होते..... त्या थरथरणाऱ्या हातांमध्ये उबदार प्रेम आणि ओलावा होता..... त्या न कळणाऱ्या अखंड बोलण्यात अतिशय आपुलकी होती..... 

आदि  त्या शेंगदाण्या च्या पुडीत रमून गेला होता. ती आजी त्याच्या डोक्या वरून हात फिरवीत त्याच्याशी खूप काही बोलत होती. 

मी तिला खुणेने किती पैसे द्यायचे असे विचारले. तिची बडबड अजूनच वाढली ... आता तर सोबत एक हात सर्व दिशेला फिरू लागला. मला काहीच कळेना. तिची Cantonese आणि माझ इंग्लिश कसे काय एकत्र येणार?! 
 ह्या सगळ्या प्रकरणात आमच्या आजूबाजूला गर्दी जमू लागली होती. त्यातील एका पोलीस ऑफिसरने आमच्या दोघींमध्ये संवाद साधला. 
आजी म्हणत होती,' आदी ला पाहून तिला तिच्या नातवाची आठवण झाली. म्हणून तिने आदी ला खाऊ दिला. त्याचे पैसे ती घेणार नाही.'

मी हसले. आजी हसली आणि आदी चे प्रश्न तर कधीचेच शेंगदाण्यां मध्ये हरवून गेले होते. 
मी Cantonese भाषेतला पहिला शब्द शिकले....."Fa -Sun" आणि लागलीच शेंगदाण्याची आजी , आमची "Fa -Sun आजी" झाली !

पहिल्याच दिवशी त्या क्षणी तो देश माझ घर झाला. माझ्या आजूबाजूला वावरणारी माझ्या पेक्षा वेगळी दिसणारी आणि वेगळी भाषा बोलणारी माणसे मला आपलीशी  वाटू लागली. खूप छान वाटू लागले. 

आदि  आणि मी हसत आनंदाने घरी परतलो. 

त्यानंतर दररोज आम्ही सकाळ , दुपार, संध्याकाळ आजीला भेटायचो. आदि  ला शेंगदाणे मिळायचे आणि मला प्रेम : न कळणाऱ्या शब्दांमधून, कष्टाने रुक्ष झालेल्या हातांच्या स्पर्शामधून आणि डोक्यावर ठेवल्या जाणाऱ्या मायेच्या हातांमधून.... 

काही दिवसांतच Hong Kong च्या आजीची आणि  आमची चांगलीच गट्टी जमली.  बाजूलाच असलेल्या पोलीस स्टेशन मधील  Hong Kong चा पोलीस काका आमचा translator बनला. आणि एक नवीन प्रवास सुरु झाला. 

त्या market च्या पलीकडच्या अंगाला वर चढणाऱ्या पायऱ्या आणि त्याला लागून escalator होता . 
आजी न चुकता त्या पायऱ्यांकडे बोट दाखवून खूप काही बोलत असे...... हळवी होत असे . एक दिवस धाडस करून पोलीस काकाला विचारले.  त्याची duty संपल्यावर आम्हाला बरोबर घेऊन तो पायऱ्या चढू लागला. 
त्यावर खूप वर्दळ होती. त्या गर्दीत आम्ही ही सामील झालो. 

एक एका पायरी सरशी आम्ही डोंगर चढत होतो.  भवती उंच इमारती चिकटून उभ्या होत्या. चढण असल्याने त्यांची उंची अजूनंच अधिक दिसत होती. अगदी नकळत आदि  आणि मी जगातल्या सर्वात लांबलचक outdoor ,covered escalator system चा अनुभव घेत होतो. चालता चालता काका  सांगू लागला ,"१९९३ साली चालू केली गेलेली Central -Mid level Escalator and walkway system एकूण ८०० मीटर्स चे अंतर cover करते.  हा  walkway आपल्याला ४४३ ft उंचीवर घेऊन जातो. ह्या अतिशय वेगेळ्या system चा जन्म Hong Kong च्या भौगोलिक स्थिती मुळे झाला. "

कमीत कमी जागेत काड्या पेटी सारखी छोटी घरे सभोवतालच्या इमारतीं मध्ये खचून भरली गेली होती. मधेच restaurants चे boards लटकलेले होते. ठराविक अंतरा वर walkway आजूबाजूच्या  मुख्य रस्त्यांना जोडला गेला होता. 

काका परत बोलू लागले ,"Hong Kong मध्ये सर्वत्र डोंगर आहेत.  सपाट जमीन फार थोडी आहे.  Hong Kong population density मध्ये जगात चवथ्या क्रमांकावर आहे. त्या मुळे डोंगरांच्या पायथ्या पासून ते थेट माथ्यापर्यंत दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती दिसतात. त्यात माणसे दाटीवाटीने राहत असतात. Central भाग हा डोंगराचा पायथा आहे तर Mid Levels हा डोंगर माथ्याशी आहे. Mid Levels escalators ह्या दोन भागांना जोडणारा दुवा आहे."

पायऱ्यां वर, escalator वर भरपूर माणसे होती. Tourists मोठाले cameras घेऊन photo काढण्यात गुंग होते. Office ला ये जा करणारी मंडळी त्या गर्दीतून वाट काढत लगबगीने चालत होती. 

बापरे! किती गर्दी आहे ह्या walkway वर?" मी नकळत बोलले. 
 "दररोज  अंदाजे ८५००० ते १००,००० माणसे ह्या मार्गाने प्रवास करतात. Central area ही business district असल्याने ह्या मार्गावर राहणारे office  ला ये जा करताना , स्थायिक रहिवासी रोजच्या कामांसाठी , भाजी साठी हा  walkway वापरतात. " गर्दीतून वाट काढत काका म्हणाले. 

मला आजीचे हातवारे , कंप सुटलेले शब्द आठवले, " आजी काय बरं सांगायचा प्रयत्न करत असते?" 
काका जरासे  खिन्न होऊन म्हणाले ," Hong Kong मध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न असतो घराचा! इथे घर , अगदी भाड्याने मिळालेले घरही प्रचंड महाग आहे.  Hong Kong जगातील सर्वात महाग देश आहे. अश्यात Income inequality प्रचंड मोठी आहे. ह्या walkway ने  जोडले जाणारे विभाग पायऱ्यांचा उंची प्रमाणे महाग आणि श्रीमंत होत जातात. आजी सारखे अनेक गरीब लोक हे सगळे फक्त मान वर करून पाहू शकतात..... त्यांना ते स्वप्नातही स्पर्शही करू शकत नाहीत. आणि त्याची खंत आजी दिवस रात्र सांगत असते. " 

खरीच ती चढत्या भाजणीतली  स्वप्न नगरी होती. जितके उंच  घर तितकी त्याची किंमत जास्त..... त्याचे क्षेत्रफळ अधिक !!!!

साधारण पणे  २०/२५ मिनिटात आम्ही Mid Level walkway च्या माथ्यावर पोचलो. 
तिथून शहराचे रूप फार वेगळे दिसत होते. जिथे नजर जाईल तिथे निळाशार समुद्र , लाटांवर  डोलणाऱ्या , नांगर टाकून उभ्या राहिलेल्या छोट्या मोठ्या बोटी...... डोंगर , छोटे नागमोडी चढत जाणारे, उतरणारे रस्ते आणि त्यावर डौलाने उभ्या असलेल्या असंख्य इमारती!

त्या उंची वरून खाली वाकून पाहताना आमची  Hong Kong ची आजी तर दिसेनाशीच झाली होती. 
त्या निळ्या स्वप्नात, आभाळात कुठे तरी हरवून गेली होती. 

म्हणता म्हणता संधिप्रकाश पसरू लागला.  त्या चित्रात वेगळेच रंग भरले जात होते. सूर्यास्त होतानाच Central district च्या सगळ्या वेगवेगळ्या आकाराच्या , उंचीत एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या office buildings झगमगायला लागल्या. त्यावरील नावं स्पष्ट दिसायला लागली..... श्रीमंत नावं , प्रतिष्ठित नावं .... HSBC , J P Morgan Chase, IFC, Mandrin Hotel आणि अगणित...... त्या चंदेरी दुनियेचे प्रतिबिंब समुद्राच्या लांटांमध्ये उभारून दिसत होत. 
 
मोठ्याल्या चकाकणाऱ्या इमारती , ती डोळे दिपवून टाकणारी झगमग आजी सारख्या असंख्य लोकांची मेणबत्यांची घर लपवत होती. 

आमची आजी त्या रंगेबेरंगी जादुई दुनियेत हरवून गेली होती. 

प्रेमाला भाषा नसते , देह नसतो, धर्म नसतो , रंग नसतो .... असतो तो फक्त मायेचा स्पर्श, डोळ्यांमधला ओलावा आणि एक मनस्वी हास्य ! आणि कदाचित शेंगदाण्याचा खारट गंध !

आदि आणि माझ्या हातात उरले होते ते तिने दिलेले उबदार  शेंगदाणे ....Fa-sun !






Friday 26 June 2020

खारट Japanese Chocolate mousse




                                      


"Sumimasen Swati san! Here for you." हातात ४ छोटेसे shot glasses घेऊन आलेली Sachi san म्हणाली. 
मी हसले ; ती हसली. "What is this, Sachi san ?" 
"Chocolate mousse .... I made ...for you ....for my best friend ." ती म्हणाली. आणि हसत मुखाने ती परतली. 

ते Chocolate mousse तोंडात विरघळतं होतं.  मी चाटून पुसून तो glass संपवून टाकला. आणि ताबडतोब धावत दुसऱ्या मजल्यावर बेडरूम च्या गच्चीत गेले. "Sachi san .......Sachi San .......Saya chan..... Saya chan ......." त्या हाक्कानसरशी रस्त्या पलीकडच्या घरातील खिडकीत छोटासा गुलाबी, गोल गरगरीत चेहेरा पडद्या आडून डोकावू लागला. 
त्या २ वर्ष्यांच्या जपानी बाहुलीला मी तिच्या आई ला बोलवायला सांगितले. दुडू दुडू धावत तिने आईला निरोप पोचता केला. 

"Domo arigato gozaimasu. Chocolate mousse ga oiishi desu."माझ्या थोड्याश्या Japanese मध्ये मी तिला धन्यवाद दिले. तिच्या बाजूला जागा करून Saya chan तिच्या सारख्याच बारीक डोळ्यांच्या, गुलाबी अंगाच्या Japanese बाहुल्या मला दाखवू लागली. 

Sachi san आणि मी Komazawa ह्या  Tokyo च्या एका छोटाश्या suburb मधल्या शेजारीणी ,अगदी सक्ख्या शेजारीणी ! आमची ओळख कशी झाली ह्या बद्दल  पूर्ण write up लागेल. 
माझ्या अखंड बडबडीने मी तिची आणि तिच्या छोट्याश्या बाहुलीची सहज मैत्रीण झाले.  मी Sachi san ची एकुलती एक आणि पहिली आणि किंबहुना शेवटची non Japanese मैत्रीण. ती आमची मैत्री जीवापाड जपते. 

Saya chan ला एक पिटुकली बहीण झाल्याने Chocolate mousse ने पेढ्यांचे काम केले होते. 

Chocolate mousse खाऊन खूप दिवस झाले होते तरी त्याची ती perfect चव माझ्या जिभेवर रेंगाळत होती. Japanese desserts  परफेक्ट गोड असतात; जास्त गोड नाहीत की अगोड नाहीत..... Just Perfect for your palate. आणि म्हणूनच ती परत परत खावीशी वाटतात. 

त्याचं दरम्यान आमच्या कडे मुंबईहून एक मित्र येणार होता. जेवणाचा  मेनू ठरवताना मला ते chocolate mousse आठवले. मी परत एकदा Sachi san ला त्याची आठवण करून देत रेसिपी मागितली. तिला म्हटले की  माझ्या मित्राला छानसं Japanese dessert देऊन surprise करायचे आहे. 
नेहेमीच्याचं  स्मित हास्याने तिने  विनंती स्वीकारली.  

Japanese लोकं दिलेला शब्द आणि वेळ काहीही झाले तरी पाळतात. Japanese take pride in that. त्यामुळे मला रेसिपी लवकरच मिळणार ह्याची खात्री होती. 

४ दिवस  रेसिपीची वाट पाहण्यात निघून गेले.  Sachi San ला परत आठवण करून द्यावी का? असा विचार मनात येऊन गेला. पण तो  पर्यंत जे काही  जपानी culture बद्दल कळलं होते त्या नुसार 'आठवण ' करून देणे म्हणजे त्यांना दुखावण्या सारखे होते. 

मैत्री आणि Chocolate mousse मध्ये ,मी मैत्री निवडली. 

पाचव्या दिवशी सकाळ पासूनच धो धो पाऊस कोसळत होता. संध्याकाळी 5 च्या सुमारास आमचा मुंबईचा पाहुणा घरी आला. 
मी ठरवलेल्या मेनू  प्रमाणे जेवण केले होते. का कोण जाणे पण माझा जीव त्या Chocolate mousse मध्येचं एवढा अडकला होता की जेवल्या नंतर Ice Cream देण्याचे ठरविले. 

पाऊसामुळे सर्वत्र काळोख झाला होता. रस्तावरचे दिवे ही मंद वाटत होते. महेश अजून घरी आला नव्हता. मित्राशी बोलताना माझे कान महेशच्या गाडीच्या आवाजाकडे लागले होते. आणि Door bell वाजली. 
"अरे ! महेश आला. आज गाडी park केल्याचा आवाज आलाच नाही. " असा म्हणत मी आमच्या घराच्या तळ मजल्यावरच दारं उघडले. जरा चपापलेंच ..... पावसाने थैमान घातले होते.  झाडं सुसाट वाऱ्याशी झुंजत होती. 

आणि अश्यात Sachi San उभी होती.  हातातली छत्री उडून जाऊ नये म्हणून तिने मानेशी घट्ट पकडली होती.  तिचा गोरा पान चेहेरा संपूर्ण भिजला होता. एका हाताशी आपल्या बाहुलीला घट्ट मिठीत घेऊन इवलीशी छत्री सांभाळत Saya Chan हसत उभी होती. गळ्यात ओजंळी बांधून त्यात २ आठवड्यांची नाजूक, पिटुकली Nana chan मुटकुळं करून झोपली होती. 

काही क्षण मला काहीच कळेना. काहीही झाले तरी आगाऊ सूचना देऊन येणारी Sachi San एवढ्या पावसात छोट्याश्या  बाळांना घेऊन का बरं आली असेल?!  उगाच नको नको ते विचार मनात येऊन गेले. 

"Swati san... Swati san... " तिच्या हाकेने मी शुद्धीत आले. तिला म्हटले पटकन आत ये. पण ती घाईत होती. तिने पटकन एक मोठा डबा माझ्या हातात दिला. 
"Swati San , This is Chocolate Mousse for you and your friend from India." मी तिच्या कडे तोंड आ वासून पाहाताच राहिले. "Sachi San , Why did you come in this heavy rain? You and your babies are getting wet."

पण ती आणि मी वेगळ्या विश्वात होतो. ती पटकन म्हणाली, " Swati San is my friend. You wanted the recipe but my baby was not well. So I didn't have time to write it down and give it to you in time. I remember you telling me that your friend will come today. So I quickly prepared it."

Sachi san पावसात भिजत होती पण माझे मन तिच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाने चिंब भिजत होते. मी अस्पष्ट पणे पुटपुटले ,"Why did you make this when your baby is not well ?"

त्यानंतर जे काही मी ऐकलें , मला कळले; ते बहुदा श्री कृष्णाने अर्जुनाला दाखविलेले ब्रम्हांड रूप असावे. 

"Swati San , You wanted to give Japanese dessert to your Indian friend. If you don't give this dessert to him then "my friend" will feel ashamed not to keep the promise. So I prepared this for the respect and pride of my best friend. Please do not tell your Indian guest that I prepared this. Please tell that you prepared this. 
Your respect is my respect because you are very important friend to me."

तिच्या अपुऱ्या, मोडक्या English शब्दानं मधून तिच्या भावना माझ्या हृदय पर्यंत पोचल्या होत्या. माझ्या हातात डबा देऊन ती  हसतच पाठमोरी वळली आणि पाऊसात दिशेनाशी झाली. 
श्री कृष्णा ने आपले रूप आटोपते घेतले होते. 

मला काहीच सुचत नव्हते. मी दार बंद केले आणि तिथेच मटकन खाली बसले. माझ्या पायात त्राण राहिले नव्हते. 
काय घडले होते?
 मी काय ऐकले?
 ती Japanese , मी Indian. 
आमच्या भाषा मोडक्या होत्या. 
माझी ....आमची ओळख काही महिन्यांची .. हसणे आणि विचारपूस सोडून मी तिच्या साठी काहीही मोठ केले नव्हते..... आणि तिचे शब्दं ,भावना परत मला ऐकू यायला लागल्या.... 
"तुझा मान तो माझा मान . माझ्या मैत्रिणीची मान पाहुण्या समोर झुकता कामा नये."

मी त्या बंद दाराच्या पायरीशी माझे डोके ठेवले. आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.... 

हातातले Chocolate Mousse 'खारट ' झाले!!!!

आणि कानावर कुमार गंधर्वांचे शब्द पडू लागले ...... 

"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
 भेटींत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या तिन्हीसांजा, त्या आठवणी, त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधीं न घडल्या गोष्टी
भेटींत तृष्टता मोठी
हसण्यांवरती रुसण्यांसाठी
जन्मजन्मीच्या गाठी
भेटींत तृष्टता मोठी…"

मला त्या दिवशी "देव"Japanese रूपात  दिसला !!!!!



Friday 19 June 2020

"ती", एक सोनेरी फुलपाखरू

एक होती मुलगी गोरी ,सोनेरी केसांची, पुसट  हलक्या ओठांची अगदी बाहुली सारखी.  आपण तिला "ती" म्हणूया. 
आणि आणखी एक होती मुलगी "तिच्या"हुन जरा वेगळी. आणि हिला आपण "ही " म्हणूया. 
लक्ष्यात ठेवा हा नीट ...... एक "ती" आणि दुसरी "ही "

"ही " ने नुकतीच  गिरगांव तल्या एका घर वजा CA च्या firm मध्ये articleship चालू केली. पार्ल्याच्या cosy suburb मध्ये वाढलेली, शिकलेली "ही " आयुष्यात पहिल्यांदाच स्वःताहुन train ने प्रवास करत होती. गिरगाव च्या गप्पा आबा आणि पपांच्या तोंडून ऐकलेल्या. Routine नविन , प्रवास नविन आणि firm मधील मुलं हि नविन .... सर्व काही अनोळखीं !
"ही " १/२ आठवड्यात सगळ्या नवीन गोष्टींमध्ये रुळली होती. सगळं कस आपलंसं वाटू लागले होते. सकाळचा प्रवास, दुपारचा डबा , company visits , audits सर्व काही बाकीच्या मुलं बरोबर वाटले जाऊ लागले. 
आणि एका सकाळी firm मध्ये "ही " ला "ती " दिसली. 

"ती" बाकीच्या पेक्षा वेगळी होती.  "ती" हसत हसत वाऱ्या सारखी आत शिरली. "ही " सोडून बाकी सगळ्यांच्या "ती" ओळखीची होती. "ही " "ती" ला बारकाईने बघू लागली. "ती" ज्या वेगात आली त्याच वेगाने भराभर काम करायला सुरुवात केली. "ही " काम करत असतांहि "ती " कडे बघतच होती. "ती" ने भराभर काम आटोपली, सऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांना न घाबरता पट्पट ताठ मानेने हसत हसत उत्तर दिली. बाकीच्या मुलांशी "ती" छान हसत होती, बोलत होती, चेष्टा मस्कऱ्या करत होती. 
"ती" चा आवाज जरा वेगळा होता... दबका होता. बोलताना "ती"चा नाकाचा शेंडा  जरासा  गुलाबी झाला होता. 
"ही "च्या शी "ती" हसून मोजकचं बोलली. 
आणि संध्याकाळ होत होती. "ही " आणि बाकीची मुले आपापली कामं आटोपती घेत होती. प्रत्येकाला train मधील गर्दी दिसू लागली होती. 
आम्ही सगळे एकत्रच निघालो. खाली आल्यावर "ती" एका bike वरून मित्रा  बरोबर भुर्रकन दिसेनाशी झाली. 
बाकी  सगळे चालत train station कडे निघालो. विषय होता "ती"......प्रत्येक जण आपापले अनुभव आणि मतं सांगत होता. 
"ही " निमूट पणे प्रत्येक वाक्यं ऐकत होती. 
Train मध्ये नशिबाने "ही "ला खिडकी पाशी जागा मिळाली. डब्यातील गर्दी जाणवेनाशी झाली. खिडकीतून चेहेर्याला लागणाऱ्या वाऱ्या सोबत "ही " "ती" चाच विचार करू लागली. 

"खरंच का "ती" रागीट आहे? खरंच का "ती" उद्धट पणे मनाला येईल ते बोलते? खरंच का "ती" कोणाचच ऐकत नाही? खरंच का "ती" पटकन रागावते? खरंच का "ती"छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडते?" "ही " ला मात्र "ती" बघता क्षणी वेगळी वाटली होती. 
"पण seniors सांगतात म्हणजे त्यात काही तरी तथ्य असेलच कि?! जाउ दे "ती" तिच्या राज्यांत खुश . आपण मुळी "ती" च्या वाटेल जायचंच नाही कसे?!" "ही " ने ठरवून टाकलं. 

दिवसा मागून दिवस गेले, वर्ष्या मागून वर्ष. आश्चर्याची गोष्ट म्हणजे "ही " आणि "ती" कधीच एकत्र audit ला गेल्या नाहीत.  "ही " "ती"ला घाबरून जरा लाम्बच रहायची. आणि "ती"ची articleship संपली. "ती" चा farewell चा कार्यक्रम झाल्यावर "ही "ने निश्वास टाकला,"चला, आता उद्या पासून ऑफिस मध्ये "ती" नाही. " "ती"ऑफिस ला येईनाशी झाली. Routine चालूच राहिले. 
मात्र "ती"गिरगावातच राहत असल्याने येता जाता भेट व्हायची. 
"ही " आणि "ती "चे आयुष्य दोन वेगवेगळ्या रूळांवर धावू लागले. 

आणि अश्यातच का, कशी ,केव्हा न जाणे पण "ही " आणि "ती" भेटल्या. आणि भेटू लागल्या, बोलू लागल्या. "ही " ची "ती" बद्दलची भीती कमी होऊ लागली. "ही " ला स्वःताच्या मनाने दिलेले vibes आठवले. ते खरे होते. "ही " ला "ती " आवडू लागली. आणि "ही " आणि "ती" छान मैत्रिणी झाल्या. 

लग्नं झाली, jobs सुरु झाले. आयुष्य दाटिवाटीचं होऊ लागले. पण  तरीही "ही " आणि "ती" मनाने अजूनच जवळ आल्या. त्या दोघी वेगळ्या होत्या पण आता zigsaw puzzle एक आकार घेऊ लागला. "ही " आणि "ती" महिन्या तुन एका शनिवारी एकमेकींन बरोबर पूर्ण दिवस घालवू लागल्या. 

"ती" कडे स्कूटर होती. "ही " स्कूटर चालवायला खूप घाबरायची. पण "ती" "ही " ला पाठी बसवून फिरवायची. 
Marine drive , गिरगाव चौपाटी , चर्चगेट ,  आणि वरळी च्या समुद्र च्या लाटा त्या दोघीं ची बड्बड , खिदळणं पाहून अजूनच जोरात फेसाळयाच्या. भर धाव स्कूटर वर बसून केसांतून वाहणारा गार वारा सगळं काही विसरायला लावायचा. "ती" ने "ही " ला नव्याने श्वास घ्यायला शिकवलं. "ती" ने "ही " ला पावसात चिंब भिजायला शिकवलं. "ती" ने "ही " ला मन मोकळ करायला शिकवलं. "ती" ने "ही " ला पुस्तकांमधील जादू दाखवली.  छोट्या छोट्या  गोष्टीं मधून आनंद अनुभवायला शिकवलं. 

आणि एक दिवस "ही " "ती" पासून दूर गेली. त्यांच्या भेटी गाठी वर्ष्यातून एकदा किंवा दोन तीन वर्षयांतून एकदा होऊ लागल्या. परत "ती" आणि "ही " आपापल्या दुनियेत एकमेकांच्या आठवणी सोबत राहू लागल्या. 

पण परत एके दिवशी "ती" ने "ही " ला फोन केला. साता  समुद्र  पलीकडून "ती" ला "ही " परत भेटली.....मनाने दोघीही परत स्कूटर वरून वारा  खात , पावसात भिजत आणि हसत खिदळत फिरू लागल्या. 

आज २० वर्षयां नंतर "ही " आणि "ती" ला भेटण्याची गरजच लागत नाही. "ती" ने आठवण काढली कि "ही " ला जाणवते. "ही " चा आवाज ऐकला नाही तर "ती" चा दिवस संपत नाही. 
"ही " आणि "ती" एक झाल्या आहेत.... त्यांची मैत्री आहे समुद्राशी, पावसाशी ,वाऱ्याशी, सूर्याशी, हसण्याशी आणि रडण्याशी सुद्धा. ...... त्यांची मैत्री आहे जगण्याशी. 

"ही " अडखळली तर "ती"चा हात ,हाक असतेच. "ती" डळमळली तर "ही " ची साथ , साद असतेच. 

आता "ही " "ती " आहे आणि "ती" "ही " आहे.... 

"ती" माझी कायमची माझी आहे. 








Thursday 18 June 2020

एक अबोली





14 June ,2020 ला सुशांत सिंग राजपूत , एक गुणी आणि  talented Human being त्याला  आपलेश्या वाटणाऱ्या अंतरिक्षात , चमचमणाऱ्या ताऱ्यां मध्ये विरघळून गेला.  पृथ्वीवर आपण सगळे अजूनंही हळहळतोय.....आपल्यातल्या  प्रत्येकाला वाटतंय ....  त्याने जर का मला phone केला असता तर त्याला मी समजावले असते. पण त्या ताऱ्याची दुःख त्यालाच माहित होती.... त्याची लढाई तो एकटाच लढत होता आणि कदाचित स्वतःशीच लढत होता. अखेर त्याला जिथे जाण्याची ओढ होती तिथे तो सुखरूप पोचला.  त्याच्या मिचक्या डोळ्यांमधले तारे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री अतिशय जोमात चमकताना दिसतील.  त्याच्या निरागस आणि खळखळणाऱ्या हास्यामुळे त्याच्या आजूबाजूचे तारे  अजूनचं  चमकतील. आपली भूमिका  फक्त "बघ्यांची". 

त्या रविवार नंतर जेव्हा जेव्हा मी ह्या आपल्यातून निखळून पडलेल्या ताऱ्याविषयी विचार करते आहे तेव्हा  मला अगदी थोड्या वेळा साठी भेटलेल्या अश्याच एका बुजऱ्या ताऱ्याची प्रकर्षाने आठवण होत आहे. हे दोन्ही तारे भेटले असतील का एकमेकांना ? आता तरी ते मन मोकळे पणी बोलू शकत असतील का एकमेकांशी? 


मी आमच्या घरातील पहिली मुलगी , मोठी मुलगी. माझ्या आबांचें  मी पहिल वाहिलं नातवंडं. माझ्या काकांची मी पहिली वहिली पुतणी .... आणि  माझे स्वतःचे त्या वेळी तरी काहीही कर्तृत्व नसताना घरात सर्वात अढळ स्थान होते...सर्वांची अतिशय लाडकी. ह्या status चे फायदे तसेच तोटे ..... 

मला  कुठल्या शाळेत घालायचे ह्या बद्दल एक "मेज" परिषद भरली. अश्या परिषदा फोल ठरल्याने आणि एकमत होतं नसल्याने मी "अ , आ ,इ ,ई ..." न शिकता "  A, B, C, D......." शिकले. परत "मेज"  परिषदेचा निर्णय बदल्यामुळे मी "पार्ले टिळक विद्यालय" मध्ये मराठीत शिकू लागले. 
माझ्या "A ,B,C,D" च्या ज्ञान्याच्या जोरावर मी मराठी शिकू लागले. त्यामुळे मला मराठी समजून घेणे आणि लिहिणे दोन्ही कठीण जात होते. मग काय शाळेत माझ्या कडे वेळच वेळ ....... 

तो वेळ घालवण्या  साठी माझी आजूबाजूच्या मुलींसोबत बडबड सुरु झाली. माझी बडबड, खिदळणे आणि शिक्षा ह्यांचे direct correlation होते. तरीही माझ्या आईच्या चिकाटीने आणि बाईंच्या मदतीने मी पहिली इयत्ता पार केली. 

दुसऱ्या इयत्तेत वर्ग दुसरा, बाई वेगळ्या मात्र आजूबाजूला मुलं मुली आधीच्याच. मला पूरक वातावरण मिळाले आणि माझी बडबड परत जोरात चालू झाली. आणि अर्थातच बडबड आणि शिक्षा यांचे correlation same राहिले. 

नवीन बाई मात्र जरा वेगळ्या आणि innovative होत्या शिक्षांच्या बाबतीत ..... 
 बाकाच्या बाजूला उभे राहणे, १ ते १० पाढे ५ वेळा लिहिणे इत्यादी इत्यादी शिक्षांशी माझी गट्टी जमली होती. आणि अश्याच एका माझ्या normal बडबडीच्या दिवशी मला एक  आगळी वेगळी शिक्षा मिळाली. 

"स्वाती , जरा उठ आणि पहिल्या बाकावर येऊन बस. आणि पुढील एक आठवडा म्हणजे सात दिवस तू इथेच बसायचं. "
 बाईंच्या धारदार आवाजा सरशी मी माझे बस्तान आवरतं घेतं पहिल्या बाकावर बसण्याचा प्रवास सुरु केला. प्रवास फक्त ४ बाकां चा होता पण त्यातही "सीते "प्रमाणे पेन्सिल, पट्टी  खाली पडत पाडत मी पहिल्या बाका पर्यंत पोचले.  वर्गातल्या सगळ्यांची  फुकटची करमणूक झाली होती. शिक्षा मिळाली असूनही बाकीच्या बरोबर मी सुद्धा खुदु खुदु पण अस्पष्ट पणे हसत होते. 
"चौथा बाक सोडून पहिल्या बाका वर बसणे ही काय शिक्षा आहे का? बाईंच्या पाठी मागे मी अजूनही हळूच बोलू शकेन. एक आठवडा काय पूर्ण वर्ष बसेन. त्यात काय मोठं ?!" असा मनातल्या मनात मी विचार करत होते. 

शेवटी चार बाकां चा तो "सोप्पा " प्रवास पूर्ण झाला. बाई शिकवू लागल्या. माझ्या बाजूला माझ्या सारखीच मुलगी बसली होती. मी तिच्या कडे दोन तीन वेळा पहिले पण तिने माझ्याकडे लक्षच दिले नाही. खांद्याला खांदा लागेल आणि पेन्सिल, पट्ट्या एकामेकांच्या हद्दीत सहज जातील एवढासा तो बाक ! तरीही तिचे डोकं मात्र खाली. 

"अरे! कमाल आहे ह्या मुलीची ! नवीन मुलीशी ओळख करून घ्यायला नको का? बाईंनीच सांगितलं होत की  ...सगळ्यांशी  हसत खेळात वागा, नवीन मुलांशी ओळख वाढावा. त्यांना बोलतं करा, त्यांच्या बरोबर खेळा. ही बहुदा स्वतःला शहाणी समजतें. असो, तू राणी तुझ्या राज्यात .!!!!... मी सुद्धा बोलणार नाही हीच्याशी. मला माझ्या मैत्रिणी आहेत.  दुसऱ्या बाकांवर बसलेल्या असतील तरीही सुट्टीत आम्ही एकत्र खेळू. हिला घेणारच नाही मीं  पकडा पकडीत." मनातल्या मनात स्वगतं चालू होते. 
पण लगेच विचार आला, " ही  खरंच शहाणी मुलगी आहे.  बाईंचं ऐकते. माझ्या सारखी नाही. कदाचित सुट्टीत बोलेल किंवा मला शिक्षा झाल्या मुळे बोलत नसेल."

अस इथे तिथे करत असतानाच मधली सुट्टी झाली. मी ताबडतोब माझा पोळी भाजीचा डबा घेऊन मागच्या बाकांवरच्या मैत्रिणीं  कडे धावले. माझ्या नवीन आणि जबरदस्तीने झालेल्या  शेजारणीला पटकन विचारले पण तिने माझ्या कडे मान वर करून पाहिले  नाही , माझ्या प्रश्नाचे उत्तरही दिले नाही. मला जरा राग आला ," खूपच आगाऊ आणि आखडू आहे ही . जाऊ दे मी कशाला माझा वेळ फुकट घालवू हिच्या साठी? तिची मर्जी!!!!" 

मी माझ्या मैत्रीण बरोबर बोलण्यात आणि खेळण्यात हरवून गेले.  सुट्टी संपली आणि परत मी माझी नवीन जागा ग्रहण केली. 
परत मला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. खांद्याला खांदे भिडले. मी लगेचच आमच्या दोघीं मध्ये पट्टी ठेवून "माझी  sovereignity declare केली."  तिच्यावर  त्या पट्टीचा आणि माझ्या declaration चा काहीही फरक पडला नव्हता. 
 त्या दिवसा अखेरीस मला तिचा प्रचंड राग आला होता ,पण तिच्या बद्दल ची उत्सुकता ही  वाढली होती. जे माझ्यात नव्हत ते तिच्यात होतं.

बोल आणि अबोल एकत्र येत  होते.     

बाईंची innovative शिक्षा अगदी पहिल्या दिवसापासूनच efficiently काम करू लागली होती.  त्या दिवशी सलग ४/५ तास मी वर्ग चालू असताना बोलले नव्हते. मात्र माझे माझ्याशी स्वगतं चालू झाले होते.  ती "अबोली" माझ्याच वर्गात आहे हे तो पर्यंत मला माहीतच नव्हते. माझ्याच सारख्यांशी बोलणे किती सोप्पं होत, पण "अबोली"शी एकही शब्द न बोलता मी बरच काही बोलत होते. 

तिचा विचार मनाशी घट्ट धरून  बोलत हसत मी माझ्या आईबरोबर घरी परतले. नकळत मी तिच्या बद्दलच बोलत होते. आधीचा  राग हरवला होता, मात्र उत्सुकता अजूनच जागृत झाली होती. माझ्या कडे  "बोल"होते; तिच्या कडे "अबोल"होते. 
अस कसं होऊ शकतं ?

दुसऱ्या दिवशी थेट माझी गाडी नवीन platform पाशी थांबली. "अबोली" माझ्या आधीच जागेवर  वर बसली होती.  पहिल्यांदा पट्टी ठेवून माझ्या राज्याची मी आजही घोषणा केली. तिला काहीच फरक पडला  नव्हता. मी तिला चिडवण्या साठी मुद्दामच जोरात बोलले," हा भाग माझा आहे. तुझ्या पेन्सिलीचे टोकही माझ्या भागात येता  काम नये." तिची मान जराही वर झाली  नाही की माझ्या कडे वळूनही पहिले नाही. बाई वर्गात येई पर्यंत गोंधळ चालू होता. जवळ जवळ सगळी मुलं आपल्या जागेवरून दुसरी कडे जाऊन किंवा जागच्या  जागीच पाठी वळून बडबड करण्यात गुंग होती. आम्हा  ५० मुलां मध्ये "ती" एकटी होती. ना तिच्या शी कोणी बोलत होते ना ती कोणाशी बोलत होती. ती "अबोली" होती. 
त्या दिवशीही  मी तिला बोलता करण्याचे माझे प्रयत्न चालू ठेवले. पण परिणाम कालच्या सारखाच..... 

दिवस तीन :
मी गेले दोन दिवस  बाई शिकवत असताना एक शब्दही बोलले नव्हते किंवा बोलू शकले नव्हते. समोर बाई आणि बाजूला अबोली!!!! 
माझ्या आधी ती आलीच होती. आज मात्र बाकावर तिची पट्टी होती. पण तिची मान मात्र त्याच स्थितीत होती. मी शांत होते. स्वगतही नव्हते आणि बोल ही नव्हते. वर्ग तसाच बोलका होता. मी मात्र तिला निरखून पाहू लागले. गेल्या दोन दिवसात ,कदाचित शाळा सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच मला तिचे अस्तित्व जाणवलं  होते. बाकी मुलांसाठी कदाचित ती "अदृश्य " होती. 
कारण ती "अबोली" होती. आमच्या आणि तिच्या मध्ये "बोल" आणि "अबोल"लाचा पल्ला होता. 

त्या दिवशी मात्र मी तिच्या भागावरही लक्ष देऊ लागले.  "A good Sovereign should establish friendly relationship with the neighbouring states too. "
तिला बाईंनी दिलेली गणितं जमत नव्हती. मी तिला थोडीशी मदत केली. तिची मान तशीच होती पण मधली पट्टी मात्र थोडीशी नकळत सरकली होती.  तिचे drawing खूप छान होते. माझी मान जेव्हा तिच्या चित्रात डोकावली ;तेव्हा तिचे चित्र माझ्या भागात हळूच सरकवले गेले. पट्टी परत एकदा थोडीशी सरकली होती. 

आज मधल्या सुट्टीत डबा मी जागेवरच उघडला. ती शांत बसली होती. माझ्या मैत्रिणी मला मागच्या बाकांवरून बोलावित होत्या पण मी त्यांना जोरात सांगितले," आज मी इथेच डबा खाणार आहे."  प्रश्न आला,"का ग?" आणि उत्तर आले,"असच."
माझ्या बाजूला काहीतरी चुळबुळ चालू होती. आणि अखेरीस तिने तिचा डबा बाहेर काढला. 
"तुला भेंडीची भाजी आवडते का? मला खूप आवडते. देऊ का तुला थोडीशी? तू काय आणले आहे ?" 
 माझ्या एव्हड्या "बोला" नीं ती अवघडली.  मला वाटलं की  ती सरकलेली पट्टी थोडीशी परत उलट्या दिशेने सरकली. 
"ठीक आहे. मी माझा डबा खाते. तू तुझा खा. चालेल? " अबोली ची मान होकारार्थी हलली. 
पट्टी परत थोडीशी सरकली. 

तिसरा दिवस संपला. आज मात्र मी खूप खुश होते. आई च्या बाजूने चालत आजूबाजूच्या मैत्रिणीशी बोलताना मी "अबोली"ला शोधात होते. पण ती दिसली नाही. 
असो!. माझ्या कडे अजून ४ दिवस होते ..तिच्या बरोबरचे ४ दिवस!

दिवस चार:
परत ती माझ्या आधी बाका वर हजर होती. माझं लक्ष्य पट्टी वर गेले. माझं राज्य  शाबूत आहे ना त्याची खात्री केली. 
आज माझ्या राज्यात थोडीशी भर पडली होती. शेजारी राज्य थोडंस मैत्री कडे झुकले  होते . चवथा दिवस जवळ जवळ तिसऱ्या दिवसा सारखाच गेला. मात्र पट्टी अजून थोडीशी सरकली होती. आता त्यातील बदल दिसून येत होता. बाई खुश होत्या; मी खुश होत होते आणि बहुदा "अबोली" ही  थोडीशी आनंदी वाटत होती. त्या दिवशी मधल्या सुट्टीत मी तिच्या बरोबर , नव्हे बाजूला बसून डबा  खाल्ला. आज मात्र तिने पटकन डबा संपवला. त्या नंतर बाहेर खेळायला जाताना मी तिला बोलावले. तिची मान खाली गेली. ती काहीच बोलली नाही ;अगदी मानेनेही. 

आमच्या वर्गातल्या बाकीच्या मुलींना ती माहीतच नव्हती. काही जणींना तिच्या बद्दल चित्र विचित्र गोष्टी माहित होत्या. मधली  सुट्टी आम्ही "अबोली" आणि तिच्या विषयीच्या गूढं गप्पां मध्ये घालवली.  
"ती बोलतच नाही. .. कोणाशीच नाही. अगदी तिच्या आईशी सुद्धा! कदाचित मुकी असावी ती?! ती नेहेमीच घाबरलेली असते. तिला कोणत्याच प्रश्नाचे उत्तर येत नाही. बाईंनी मागे एकदा तिला उभा करून प्रश्न विचारला तर ती मान खाली घालून किती तरी वेळ उभीच राहिली."

बाई समोर नसतानाही , चक्क मधल्या सुट्टीतही मी  गप्प होते, शांत होते आणि माझे "बोल" माझ्या पासून दूर झाले होते. कोण बर असावी ही  "अबोली"?

घरी परत जाताना मला ती दिसली. आईचा हात तिने घट्ट पकडून ठेवला होता. मात्र रस्त्या वरच्या गर्दीत ती उठून दिसत होती.... ती रस्त्याच्या  .... गटारांच्या अगदी कडे कडेने चालत होती... ती तीच होती "अबोली". तिची मान तशीच खाली होती. ती तिच्या आईशीही बोलत नव्हती . तिला बघत बघत माझे घर कधी आले ते  कळलेच नाही. ती अजूनही माझ्या समोर चालतच होती. 
मी माझ्या घराच्या gate पाशी थांबले. ती "अबोली " माझ्या घराच्या समोरच्याच बिल्डिंग मधे राहत होती. 
"अररेच्या ! हे मला आज कळतंय? ती कधी दिसलीच नाही मला. " मला आनंद झाला होता. 

दिवस ५,६,७:
राहिलेले तिन्ही दिवस जवळ जवळ आधी सारखेच गेले. तिची मान अधून मधून हलली. आम्ही दोघीनी एकाच बाका वर डबे खाल्ले. मी तिला उत्तर शोधण्यात मदत केली. आणि सातव्या दिवशी दोन्ही राज्य एक झाली. पट्टी नाहीशी झाली. 
पण "अबोली" अजूनही तशीच होती....."बोलां” शिवाय . पण आता ती माझी मैत्रीण झाली होती. बाकी मैत्रिणींपेक्षा थोडी जास्त चांगली मैत्रीण. 

शिक्षा संपली. बाईंनी मला परत माझ्या आधीच्या जागी बसायला परवानगी दिली. मी सुट्टीत बाईंच्या खोलीत गेले. आजूबाजूला जास्त कोणी नाही असे बघून मी बाईंना गाठले. " काय ग? काय पाहिजे? आता खुश ना ? शिक्षा संपली. पोटात दुखतंय का?" 
" नाही. हम्म्म्म्म ...बाईईईई , मला तुमच्याशी थोड बोलायचं होतं. बोलू  का?" 
बाई मला घेऊन एका शांत कोपऱ्यात गेल्या. त्यांचा आवाज शांत पण गंभीर होता. का कोण जाणे पण त्यांचे डोळे मला सांगत होते ," मला माहिती आहे तुला काय सांगायचे आहे ते. 
"स्वाती.... अग बोल ना.... बराय ना तुला? बोल.... मी ऐकतेय."
त्या शब्दांनी मी भानावर आले ....कदाचित माझं भान हरवलं  आणि मी ओकसाबोक्शी रडू लागले. माझे "बोल" त्या खारट पाण्यात वाहून जात होते. ६/७ वर्षयांचया स्वातीला बाईंनी जवळ ओढले आणि मिठीत घेतले. "रडू नकोस. काय झाले आहे ते सांग."
"बाई , माझी शिक्षा संपली." मी अजूनच जोरात हुंदके देऊ लागले. "मला परत शिक्षा करा ना? मला पहिल्याच बाकावर बसायचे आहे." नाकातून वाहणारे पाणी आणि डोळ्यातील पाणी एकत्रं मिसळत होते. 
"आधी तू शांत हो. मी तुला का म्हणून परत शिक्षा करेन? गेल्या सात दिवसांत तू एकदाही उत्तरा  खेरीज एक शब्द ही बोलली नाहीस. किती हुशार आणि गुणी विद्यार्थिनी आहेस तू? मला तू खूप आवडतेस. "
" पण बाईईईई..... मला तो पहिला बाक आवडतो.... मला ना ...मला ना..... ती "अबोली" आवडते."
बाई मनापासून हसू लागल्या. त्यांनी माझी पाठ थोपटली. का ते मला बरेच वर्ष कळले नाहीं आणि जेव्हा कळले तो पर्यंत खूप उशीर झाला होता..... 

इयत्ता दुसरी मी माझ्या  "अबोली" बरोबर पार पाडली . पहिल्या बाकावरचा प्रत्येक दिवस सारखाच होता..... तेच दोन डबे, खेळायला येण्याचा आग्रह, प्रश्नांची उत्तरं , तिची अधून मधून हलणारी आणि बहुतेक वेळा खाली घातलेली मान आणि माझे "बोल" आणि तिचे "अबोल" ...... 

आणि वर्ष्यानं मागून वर्ष धावू लागली तसे आमचे वर्ग वेगळे झाले. अभ्यास, परीक्षा , स्पर्धा ,मैत्रिणी, वाढल्या.... आम्ही सगळे मोठे होत होतो.  शाळेत येण्या जाण्याचा मार्ग बदलला .... 

ह्या गर्दीत आणि वेगात ती "अबोली" कुठे तरी हरवली. तिचा पकडलेला हात माझ्या हातून निसटून गेला. आणि मला ते कळल ही नाही.....मुख्य म्हणजे जाणवल ही  नाही. 

मी परत बोलकी झाले. आता मात्र मोठी झाल्याने शिक्षा नाहीश्या झाल्या. आणि माझी "अबोली" दिसेनाशी झाली. 
मी  " जबाबदार" झाले. 

"जबाबदार मी, हुशार मी, अभ्यासू मी, आणि बोलकी मी" आता कॉलेज मध्ये जाऊ लागले. 
माझे विश्व perfect होते...... बोलके होते. 

आणि एका दुपारी मला ती "अबोली " दिसली. 
ह्या वेळेस मात्र तिची मान सरळ होती. तिचा चेहेरा शांत होता. मी प्रथमच तिचा चेहेरा इतक्या जवळून स्पष्ट पणे पाहत होते. 
तिच्या ओठांवर  एक मलूल हास्य होते. तिचे डोळे मिटलेले होते. आणि ती अबोल "अबोली" होती. 

मी थरथर कापू लागले. माझे शरीर  थंड पडले. पायातले त्राण गाळून पडले आणि मी धबकन खाली बसले. 

"अबोली ...माझी अबोली" निघून गेली होती. 
जेव्हा १६/१७ वर्ष्यांच्या आम्हा सगळ्यांचे "बोल" आकाशला साद घालू बघत होते, उज्ज्वल भविष्याचे मनोरे रचत होते तेव्हा ही  १६/१७ वर्ष्यांची "गोरी, नाजूक आणि अगदी आमच्या सारखीच दिसणारी 'अबोली" अंतराळात सामावून गेली होती. 

बोलक्या माणसांकडे एकच "बोल" उरला होता......"का?"

अबोली कडे बोल नव्हते. त्याची कारणं खूप असतील पण मी कधीच शोधली नाहीत. 

तिच्या बाजूला बसणें ही  माझ्या दृष्टीने एक शिक्षा होती. पण तिला काय वाटत होते हे कधीच शोधले नाही. 
 
मी माझे राज्य घोषित करून तिच्या माझ्यात पट्टी ठेवली होती. त्या  विभागणीने तिला कसे वाटले असेल?

४९ मुले वर्गात पटापट उत्तर देत असताना आपले "बोल" सोडून गेल्या नंतर तिला कसे वाटले असेल?

मधल्या सुट्टीत मुलांच्या गर्दीत  आणि आवाजात एकटं  राहुन तिला कसे वाटले असेल?

तिच्या सोबत बसून आपापला डबा खाण्यातील आनंद माझ्या पेक्षा तिला जास्त झाला असेल का? 

माझ्या कडून  प्रश्नांची उत्तर समजावून घेताना तिला कसे वाटले असेल?

ती "पट्टी" नाहीशी झाल्यावरच तिचा आनंद माझ्या पेक्षा  किती तरी पटीने जास्त असेल बहुदा. 

आणि जेव्हा मी तिचा हात सोडला...... मी तिला आयुष्याच्या गर्दीत हरवूंन बसले.....  इतके की….मला जराशी आठवण ही  होऊ नये...... 
कुठल्या दिव्यातून गेली असेल ती? 

एकटीचं रडली असेल ती एका कोपऱ्यात; आजूबाजूच्या गर्दीत  बोलणे चालू असताना. 

मी कुठे होते ती रडताना.... मी का हरवलं तिला?
 
मी तिचे "बोल" होते....... आणि ती माझी "अबोली"...... 
आज प्रथमच तिची मान ताठ होती , आणि माझी झुकलेली. 
मी तिच्या खाली घातलेल्या डोळ्यांमध्ये पाहण्याचा प्रयत्नही कधी केला नाही. का?

नक्कीचं  आता ती तिच्या राज्यात राणी असेल. हसत असेल , बागडत असेल , आनंदी असेल. 

तिला आपण  हवे होतो का ?...... की  आपल्याला  तिची जास्त गरज होती? 

एका हाताला दुसरा हात लागतोच.... तिच्या हातीं  कोणाचाच हात नव्हता ....आणि म्हणूनच ती न बोलता अबोली आपल्यातून  कायमची निघून गेली. 
"अबोली".....ती माझ्या पेक्षा, आपल्या सर्वांपेक्षा खूप खूप वेगळी होती. 

आता उरले ते फक्त प्रश्न ..... एक प्रश्न माझ्या श्वासात नेहेमीच असतो आणि कायम राहिलं  "मी तिचा हात पकडला असता तर?..... तिला उत्तर शोधण्यात मदत केली असती तर?......" 

अबोली मात्र खुश आहे...... तिच्या सारख्याच टिमटिमणाऱ्या ताऱ्यां मध्ये खेळ्तेय ...हसतेय. 

मी दररोज रात्री "तो अबोली" तारा शोधते...... सापडला तर तिचा हात घट्ट पकडून ठेवायला..... तिची उत्तर  शोधायला ..... 
पण डोळ्यातले पाण्या मुळे "अबोली" ताऱ्यां मध्ये हरवून जाते. 














Index

तू भास , तूचि आभास